
बायको आसरा दिला या रागातून नवऱ्याने शेजारी महिलेवर सूरीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात महीला गंभीर जखमी झाली आहे. जखमी अवस्थेत महिलेला ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे घडली. दर्शना झाडे असे जखमी महीलेचे नाव आहे.
तालुक्यातील बोरगाव येथिल संघमित्र फुलाझले याचे काही दिवसापुर्वी पत्नीशी भांडण झाले होते. आरोपीच्या पत्नीने शेजारी असलेल्या दर्शना झाडे हीच्या घरी आसरा घेतला होता. पत्नीला आसरा दिला, याचा राग संघमित्र फुलझले याला होता. हातात कोंबडी कापण्यासाठी वापरात येणारी सुरी घेऊन तो गावातील रस्त्यावर फिरत होता. रस्त्यावर जो दिसेल त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत होता. अशातच दर्शना झाडे ही महिला पानटपरी जवळ आली. त्याच वेळी संघमित्र याने पानपटरी मालकावर हल्ला केला होता. मात्र या हल्यातून पानटपरीधारकांने स्वताचा बचाव केला. मात्र तिथे उभी असलेली दर्शना झाडे दिसताच त्याचा राग अनावर झाला. त्याने धाव घेत दर्शना झाडे हिच्या मानेवर आणि कानाजवळ सुरीने वार केला. ती रस्त्यावरच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळली.
या घटनेची माहीती गावकऱ्यांनी गोंडपिपरी पोलिसांना दिली. गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू यांनी पोलीस जवानांना घेऊन घटनास्थळ गाठले. जखमी अवस्थेत असलेल्या दर्शना झाडे यांना उपचारासाठी गोंडपिपरीला पाठवले आहे. आरोपीला ताब्यात घेतले असून जखमीवर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. पुढील तपास ससहायक पोलिस निरीक्षक मोगरे करीत आहेत.


























































