विलेपार्ले येथून 3 लाख 32 हजारांची स्कॉच जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीहून आणि डय़ुटी फ्रीमधून आणलेली स्कॉच महागडय़ा दरात विकून सरकारचा महसूल बुडवणाऱया दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभाग उपनगरच्या ‘पी’ आणि ‘एस’ विभागाने अटक केली. सूरज हदौले आणि हरी जिवा छागा अशी त्या दोघांची नावे आहे. त्या दोघांकडून 3 लाख 32 हजारांची स्कॉच जप्त केली आहे.

राज्यात अवैध मार्गाने मद्याची तस्करी होऊ नये याच्या सूचना आयुक्त कांतीलाल उमाप यांनी अधिकाऱयांना दिल्या. अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात काही जण स्कॉचची तस्करी करत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. मुंबई उपनगरच्या अधीक्षिका स्नेहलता श्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कागणे निरीक्षक, मोमीन, केदार, जगताप, गाढवे, साळुंखे, रणदिवे यांच्या पथकाने अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात सापळा रचला. सापळा रचून सूरजला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 24 आणि घरातून 25 स्कॉचच्या बाटल्या जप्त केल्या. जप्त केलेल्या स्कॉचची किंमत 2 लाख 13 हजार इतकी आहे. सूरज हा दिल्ली येथील दारूच्या दुकानातून आणि डय़ुटी फ्री शॉपमधून स्वस्तात स्कॉचच्या बाटल्या खरेदी करतो. स्कॉचच्या बाटल्या खरेदी केल्यानंतर तो एक्स्प्रेसने मुंबईत येतो. मुंबईत आल्यावर तो महागडय़ा किमतीत त्या स्कॉचची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

दुसरी कारवाई विलेपार्ले परिसरात केली. विलेपार्ले येथे एक जण स्कॉच विकत असल्याची माहिती ‘पी’ विभागाला मिळाली. त्या माहितीनंतर आर. खान निरीक्षक, एम. के. निमदे, एस. डी. शिलेवंत, कारभारी, मयेकर, बेलगिरी यांच्या पथकाने विलेपार्ले येथे सापळा रचला. सापळा रचून हरीला उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतले. हरीकडून 23 स्कॉचच्या बाटल्या जप्त केल्या आहे. जप्त केलेल्या बाटल्यांची किंमत 1 लाख 13 हजार इतकी आहे. हरीदेखील दिल्ली आणि डय़ुटी फ्रीच्या माध्यमातून स्कॉच मुंबईत आणत असल्याचे तपासात समोर आले. स्कॉचच्या विक्रीप्रकरणी त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायालयाने एक्साईज कोठडी सुनावली आहे.