
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या दोन चुलत पुतण्याच्या घरातून चोरट्यांनी तब्बल 54 लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान येरवड्यातील संगमवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी हरिश्चंद्र उर्फ राजू मनोहर मोझे (वय 49, रा. संगमवाडी ) यांनी यरेवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र मोझे बांधकाम व्यावसायिक असून 3 सप्टेंबरला ते भावासह महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून 40 लाख 20 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच चोरट्यांनी हरिश्चंद्र यांचे भाऊ मोहन मनोहर मोझे यांच्या घरातून 13 लाख 26 हजारांचा ऐवज चोरून नेला. दोन्ही घरातून चोरट्यांनी मिळून तब्बल 53 लाख 46 हजारांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, महाबळेश्वरहून फिरून आल्यानंतर मोझे कुटूंबियांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ पोलिसांनी माहिती दिली.
चोरट्यांनी मोझे कुटूंबियांच्या घराचे कुलूप उचकटून 53 लाखांपेक्षा जास्त रकमेचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही तपासून आरोपींचा माग काढला जात आहे.
– समीर करपे, सहायक पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस ठाणे





























































