
सेवानिवृत्त प्राध्यापक मंगल गोगटे यांच्या चित्रांचे प्रदर्शन येत्या 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, डॉ. ऍनी बेझंट रोड, वरळी येथे आयोजित करण्यात आले आहे. निसर्ग चित्र तसेच आधुनिकतेचा स्पर्श असलेली चित्रं बघण्याची संधी कलाप्रेमींना मिळणार आहे. गोगटे यांचे हे पाचवे प्रदर्शन आहे.
शिवाजी पार्क, दादर येथे राहणाऱ्या मंगल गोगटे या स्तंभलेखन करतात. मागील 25वर्षे त्या वाहतूक पोलिसांच्या रस्ता सुरक्षा सल्लागार समितीत काम करतात. त्यांना चित्रकलेची आवड होती, पण कामामुळे सवड मिळत नव्हती. प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांना चित्रकलेची आवड विकसित करण्यासाठी वेळ मिळाला. वॉटर कलर माध्यमातील चित्रांसह त्या ऑइल आणि ऍक्रेलिक माध्यमातील चित्रकला शिकल्या. याशिवाय चित्रांमध्ये फेव्हिकॉल वापरण्याचा नवा प्रयोगही त्यांनी केला. याविषयी गोगटे म्हणाल्या, याआधी माझी वॉटर कलर माध्यमातील चार प्रदर्शने झालेली आहेत. आता ऑइल आणि ऍक्रेलिक माध्यमातील निसर्ग चित्रे आणि मॉर्डन चित्रे रसिकांना बघता येतील.
























































