
रत्नागिरी शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्यांची चाळण झाली आहे. हे खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. नळपाणी योजनेच्या नियोजनशून्य कारभारामुळे आज रत्नागिरी शहरवासियांसह गणपती बाप्पांलाही रस्त्यातील खड्ड्यांचे विघ्न सहन करावे लागत आहे.
रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेसाठी सर्वच रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हे खोदकाम सुरू राहिल्याने पावसात शहरातील रस्त्यांची अवस्था भयाण झाली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकी, चारचाकी वाहनांना रस्त्यावरील खड्डे चुकविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पाऊस पडत असताना खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही अशावेळी जीवघेणा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. खड्ड्यात साचलेलं पाणी आणि चिखलाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यातून गणपती बाप्पांचे आगमन झाले असून आता विसर्जनाच्या वेळीही खड्ड्यांचे विघ्न कायम आहे.
प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार
नळपाणी योजनेसाठी रस्त्याचे खोदकाम हे पावसाळा येण्याआधी काही दिवस थांबवून खोदलेले रस्ते पूर्ण करणे गरजेचे होते.मात्र पाऊस तोंडावर आला तरी खोदकाम सुरू राहिल्याने मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने रस्त्यांची उर्वरित विल्हेवाट लावली आहे.ऑगस्ट महिन्यात नगरपरिषदेने खड्डे भरायला सुरूवात केली होती पण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या पावसाने ही मलमपट्टी वाहून गेली आहे.



























































