
गणपतीपाठोपाठ येणाऱया गौरी सणाला एक वेगळं वलय आहे. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हटले जाते. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात.
आपापल्या पद्धती आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात. हातात गौरी घेऊन आलेल्या सवाष्ण महिलेचे पाय दूधपाण्याने धुऊन त्यावर पुंकवाचे स्वस्तिक काढले जाते. वाजत गाजत गौरीचे स्वागत करत आत येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत गौरींचे मुखवटे आणले जातात. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, कपाटे, दूध-दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवून आशीर्वाद घेत ‘‘ऐश्वर्य नांदो’’ अशी प्रार्थना करण्यात येते. या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात. पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावलापावलांनी या गौरींना घरात आणले जाते.
हिंदू धर्मशास्त्रात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे.‘अपराजितपृच्छा’ या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. ‘अग्निपुराणा’मध्ये गौरीमूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. एकदा असुरांच्या त्रासाला पंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपले सौभाग्य रक्षण झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.
स्थळपरत्वे गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. प्रांतानुसार गौरीपूजन वेगवेगळे असते . दक्षिण हिंदुस्थानात भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो व तो बरेच दिवस चालतो. प्रत्येक गावात गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात व तिला मखरात बसवून पुजतात. तिची रस्त्यातून मिरवणूकही काढतात. कोकणात कोळी समाजातील महिला या दिवशी तेरडय़ाची फांदी आणून तिला लक्ष्मीस्वरूप मानून तिची पूजा करतात. या दिवशी देवीला माशाचा नैवेद्य दाखविला जातो. उर्वरित महाराष्ट्रात थाटामाटात गौरीपूजन केले जाते.
कोकणस्थांमधे खडय़ांच्या गौरींची प्रथा आहे. काही काही कुटुंबांत गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबांत परंपरेनुसार पाणवठय़ावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडीचोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्या मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडीचोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरडय़ाचीही गौर असते. तेरडय़ाची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले असा समज आहे. गौरी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही मांडतात. एक किंवा दोन मुलासारखा आकार बनवून प्रतिकृती म्हणून बाळ ठेवतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पुजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. काही ठिकाणी झोपाळ्यावरही हलत्या गौरी बसविल्या जातात.
गौरी आवाहनाचा दिवस म्हणजे पहिला दिवस वर वर्णन केला आहेच.
गौरी पूजनाचा दिवस दुसरा म्हणजे एकदम शाही जेवण आणि थाटमाट असतो. सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. गौरीच्या रूपातील सवाष्ण महिलेला नमस्कार करून वर वर्णिलेले जेवण देऊन तृप्त केले जाते.
महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदीपुंकू कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे.
तिसरा म्हणजे विसर्जनाचा दिवस. या तिसऱया दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी माघारी निघतात. महिनाभर गौराई येणार म्हणून वाजतगाजत असलेलं घर काहीसे उदास आणि शांत होते. विसर्जन म्हणजे थोडीशी हलवून मूर्ती उचलली जाते. अक्षता वाहून सगळे नमस्कार करतात. गौर सासरी निघते. गौरींचे नदीत विसर्जन करतात. घरी येताना आणलेली वाळू घरभर पसरली जाते. तीन दिवसांचं हे माहेरपण आठवणींमध्ये वर्षभर पुरवायचं आणि पुढच्या वर्षाची वाट पाहायची असा हा खास महिलांचा सण आहे.
n विलास पंढरी



























































