कपड्यांसाठी इकोफ्रेंडली क्लिप, प्लॅस्टिक मुक्तीसाठी मुंबईकर ऋत्विकचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाल्कनीत वाळत घातलेल्या कपडय़ांना आपण क्लिप लावतो. अनेक घरांमध्ये प्लॅस्टिकच्या क्लिप (क्लोथिंग पेग) वापरल्या जातात. कारण त्या स्वस्त असतात. घराघरांत वापरल्या जाणाऱया या क्लिप कचऱयात टाकल्यावर प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. तसं बघायला गेलं तर ही लहान वस्तू आहे, पण त्याचा ज्या प्रमाणात वापर होतो, तो बघता पर्यावरणावर मोठा परिणाम होऊ शकतो. याचाच विचार करून शीव येथे राहणाऱया 21 वर्षांच्या ऋत्विक जाधवने एक खास क्लिपचे डिझाईन केलेय. ही क्लिप पर्यावरणपूरक, रिसायक्लेबल आणि टिकाऊ असेल.

21 वर्षांचा ऋत्विक प्रॉडक्ट डिझायनर आहे. सध्या तो बंगळुरू येथील एका कंपनीत काम करतोय. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्याने क्लोथिंग क्लिप प्रोटोटाईप तयार केला. साधारणपणे कपडय़ांच्या क्लिपमध्ये दोन प्लॅस्टिक बॉडी आणि मध्ये स्प्रिंग असते. ऋत्विकला मात्र संपूर्ण क्लिप एकाच मटेरियलची करायची आहे. दुसरं म्हणजे, प्लॅस्टिकच्या क्लिप उन्हात तुटतात. तसेच मधल्या स्प्रिंगला गंज लागला की, कपडय़ांवर डाग पडण्याची शक्यता असते. जर सिलिकॉन किंवा नैसर्गिक रबर यापासून क्लिप केली तर ती खराब होणार नाही. कपडय़ावर जास्त घट्ट पकड बसेल असे मटेरियल वापरण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

ऋत्विकने एकदा बाहेरून खाणं मागवलं होतं. त्यावेळी चटणी आणि सांबर प्लॅस्टिकच्या डब्यातून देण्यात आले होते. खाऊन झाल्यावर प्लॅस्टिकचा डबा कचऱयात फेकताना आपण पर्यावरणाचे नुकसान करतोय ही खंत त्याला वाटली. यावर काहीतरी उपाय शोधताना त्याची नजर कपडे सुकवण्याच्या क्लिपवर पडली. त्याने लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यांत प्रॉडक्ट प्रोटोटाईप तयार केले आणि क्लिपचा प्रयोग कपडय़ांवर करून बघितला. तो यशस्वी झाला. यापुढे जोरदार हवेत तग धरून राहतील किंवा चादरींसारख्या मोठय़ा कपडय़ांवर घट्ट बसतील, अशा मजबूत क्लिप तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे ऋत्विकने सांगितले.