
राज्यातील अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याबाबत सहकार विभागाने अखेर गुरुवारी आदेश जारी केले. गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीची ही प्रक्रिया तत्काळ सुरू होणार आहे. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका अखेर मार्गी लागणार आहेत.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका नुकत्याच जाहीर केल्या. परंतु प्राधिकरणाच्या अखत्यारीत नसल्यामुळे अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुकीबाबत निर्णय झाला नव्हता. राज्यात एकूण सोसायट्यांच्या तुलनेत अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या जवळपास 90 टक्के आहे.
कालावधी संपूनही सोसायट्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका न झाल्यामुळे बहुतांश पदाधिकारीही त्रासले होते. त्यामुळे अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सभासदांकडून करण्यात येत होती. अडीचशे किंवा त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी सोसायटीवर सोपविली आहे.






























































