मनतरंग – चेकमेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

ओसीडी म्हणजेच ऑब्सेसिव कम्पल्सिव डिसऑर्डर हा एक असा मानसिक आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला अवास्तव असे विचार किंवा असंबद्ध आकृती (बऱयाचदा अश्लील आणि घाणेरडे असू शकतात) डोक्यात घुमत राहतात. यास ‘ध्यास’ (obssession) असे म्हणतात.  हे सर्व त्या व्यक्तीला अत्यंत त्रासदायक असतं. कारण तिला आपल्याच विचारांची लाज वाटत असते, घाण वाटत असते आणि महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला हे सगळं थांबवणं शक्य होत नाही. 

 शहा पती-पत्नी (आडनाव बदलले आहे) हे त्यांच्या समाजातील एक प्रतिष्ठत असे गणले गेलेले दांपत्य होते. वडिलोपार्जित चालत आलेला कपडय़ांचा व्यवसाय मि. शहांनी मोठय़ा मेहनतीने नावारूपास आणला होता आणि अजूनही त्यांचे व्यवसाय वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न चालू होते. साधारण पन्नाशीत पोहोचलेलं हे जोडपं म्हणूनच सगळ्यांसाठीच एक आदर्श जोडपं होतं. मि. शहांना पहिल्यापासून एक सवय होती. कुठलाही जमाखर्च किंवा पैशांचा व्यवहार हा सारखा सारखा पडताळून बघण्याची! एक-दोनदा हिशेब पाहिल्यावरही त्यांच्या मनाचे समाधान होत नसे. स्वतःच्या दुकानातही ते तासन्तास हिशेबाच्या वह्या तपासत बसायचे.

कॉम्प्युटर आणि अकाऊंटंटवर त्यांचा विश्वास नव्हता. कारण त्यांना सतत एक ‘भीती’ असायची. ‘कॉम्प्युटरवर चुकीचे आकडे टाकले गेले तर?’ आणि ‘अकाऊंटंटकडून चुकून हिशेब वर-खाली झाला तर?’ यामुळे त्यांनी पैशांचा कुठलाही व्यवहार हा कोणाकडेही दिला नव्हता. त्यांचे दुकान हे रात्री नऊपर्यंत बंद होत असे. मि. शहा मग जे हिशेब तपासायला आणि आकडेमोड करायला बसत ते रात्री अकरा वाजेपर्यंत. वास्तविक पाहता हिशेब पाहायला अर्धा तासही भरपूर असायचा, पण मनाची समजूत काही दहा वेळा तीच आकडेमोड केल्याशिवाय होत नसायची. दुकानापासून पंधरा मिनिटांवर त्यांचे घर होते, पण ते कधीही पंधरा मिनिटांत घरी पोहोचत नसत. त्यांना  घरी पोहोचायला जवळ जवळ एक तास लागायचा. कारण दुकान बंद करताना ते चारपाच वेळा पंखे-लाईटस् बरोबर बंद आहेत ना, हे चेक करत असत. ते झाल्यावर दुकानाचं शटर पुन्हा चारपाच वेळा ओढून चेक करत असत. हे सगळं इथपर्यंत झाल्यावर ते पत्नीला फोन लावत, ‘‘मी येतोय!’’

 अर्धा रस्ता चालल्यावर मि. शहांना शंका यायची, ‘‘कदाचित चेंजिंग रूमचा पंखा सुरू आहे’’. मग ते पुन्हा दुकानात शिरत. पुन्हा सगळं चेक. तेही त्याच विशिष्ट क्रमात. पंखे-लाईटस्, शटर ओढणं. पुन्हा घरी यायला निघणं, पण पुन्हा एक शंका, ‘‘मी पंखा तर चेक करताना लाईट लावलेला. मग बटन व्यवस्थित बंद केलंय का?’’ पुन्हा हा चेक-चेकचा खेळ सुरू होई. सौ. शहांनीसुद्धा त्यांची वाट बघणं सोडलं होतं कारण त्यांना ‘‘ह्यांना आता किती वेळ लागेल’’ हे माहीत होतं.

जेव्हा दोघेही समुपदेशनासाठी आले त्यावेळी मि. शहांच्या हातात एक मोठी फाईल होती, ज्यामध्ये प्रत्येक बिलाच्या जवळपास दहा-बारा कॉपीज होत्या. त्यांच्याच हस्ताक्षराच्या. कारण तेच होतं, चेक करणं. ‘‘कदाचित मी चुकलोय. धंद्यात नुकसान नको’’ म्हणून त्यांनी त्यांचा प्रत्येक दिवसाचा जमाखर्च दहावेळा लिहिला होता. तोही अगदी व्यवस्थित, पद्धतशीरपणे. तरीही त्यांचे समाधान होत नव्हते म्हणून त्यांनी सौ. शहांकडूनसुद्धा तीच आकडेमोड परत करवून घेतली होती. मि. शहांचं हे असं वागणं त्यांच्या पत्नीला मनस्ताप देत होतं.

त्या दोघांशी बोलताना लक्षात आलं की, फक्त आकडेमोड नव्हे तर आणखीही काही गोष्टी त्या दोघांसाठी ताण आणणाऱया होत्या.  कुठेही बाहेर जायचं असलं की, मि. शहांचं सारखं घराचे स्विचेस बंद करणं आणि पुनः पुन्हा ते चेक करणं असायचं. देवळात नाही गेलं तर अभद्र (कधीतरी अश्लील) विचार आपली पाठ सोडणार नाहीत या भीतीने देवळात चकरा मारणं असायचं. हातात त्यांच्या कायम सॅनिटायझर असायचा. हात स्वच्छ केल्यावरही ते पुनः पुन्हा हात धुत. कारण ‘‘हात धुतल्यावरही काही घाण चिकटली तर नाही ना’’ हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नसे.

अशी सगळी ‘मंत्रचळा’ची म्हणजेच ऑब्सेसिव कम्पल्सिव डिसऑर्डरची (OCD) लक्षणे शहा दांपत्याच्या बोलण्यातून लक्षात येत होती. ओसीडी हा एक असा मानसिक आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला अवास्तव असे विचार किंवा असंबद्ध आकृती (बऱयाचदा अश्लील आणि घाणेरडे असू शकतात) डोक्यात घुमत राहतात. यास ‘ध्यास’ (obssession) असे म्हणतात.  हे सर्व त्या व्यक्तीला अत्यंत त्रासदायक असतं. कारण तिला आपल्याच विचारांची लाज वाटत असते, घाण वाटत असते आणि महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला हे सगळं थांबवणं शक्य होत नाही. म्हणूनच असे विचार मनातून आणि डोक्यातून घालविण्यासाठी ती व्यक्ती मग काही गोष्टी ठराविक पद्धतीनेच करत असते. म्हणजे हात धुणे, देवाला नमस्कार करणे किंवा सारखी आंघोळ करणे. याला ‘सक्ती’ (Compulsions) असे म्हणतात.

या प्रकारात केवळ व्यक्तीच नव्हे, तर तिचे पूर्ण कुटुंबच ओसीडीमय होऊन जाते. कारण घरातल्या सर्व सदस्यांना स्वच्छतेच्या आणि  परिपूर्णतेच्या बाबतीत कमालीचे सतर्क राहावे लागते अन्यथा त्या व्यक्तीच्या पराकोटीच्या रागाला सामोरे जावे लागते. कारण त्यांच्या सांगण्याप्रमाणे जर कोणी वागले नाही किंवा त्यांचे ऐकले नाही, तर त्यांचा राग वाढतो, चिडचिड वाढते.

ओसीडी असलेल्या व्यक्ती या आत्मविश्वास गमावून बसलेल्या असतात. तसेच त्यांची स्व-प्रतिमा बरीच नकारात्मक असते. या कायम स्वतःभोवतीच फिरत राहतात. कारण त्यांचे अवास्तविक विचार आणि अतार्किक कृती त्यांची पाठ सोडत नाहीत. या सगळ्याचा त्यांना भयंकर मानसिक त्रास होत असतो. त्यांच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. अशा वेळेस लवकरात लवकर मानसशास्त्रीय सल्ला घेणं आवश्यक आणि फायदेशीर असतं.

शहा पती-पत्नींना या आजाराचे गांभीर्य लक्षात आले होते. लगेच त्यांनी तसे उपचार सुरू केले. तसेच ताणतणाव आणि अवास्तव विचारातून सुटका मिळावी म्हणून समुपदेशनही सुरू केले. काही काळानंतर त्या दोघांना, विशेषतः मि. शहांना त्याचा फायदा होऊ लागला. त्यांच्या ‘सक्ती’च्या कृतींमध्ये बऱयापैकी सुधारणा होऊन त्यांचे प्रमाण कमी झाले. त्यांच्या या सर्व उपचार पद्धती त्यांच्या पत्नीलाही सामील केले गेले. सौ. शहा त्यांच्या वागण्यावर आणि विचारांवर लक्ष ठेवून त्यांना ध्यास प्रवृत्त विचारांतून दुर्लक्ष करण्यासाठी मदत करू लागल्या. मि. शहांना प्रोत्साहन देत राहिल्या. त्यांचा गेलेला आत्मविश्वास आणि गमावलेली स्व-प्रतिमा परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहिल्या. आज मि. शहा नियमितपणे औषधोपचार घेत आहेत. योगसाधना करत आहेत. त्यांच्या अतार्किक विचारांपासून मुक्ततेसाठी त्यांनी एक मार्ग अवलंबला आहे – जास्त लक्ष न देणे, शक्य तेवढे स्वतःला व्यस्त ठेवणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे.  हाच त्यांचा त्यांच्या ओसीडीवर त्यांनी केलेला चेकमेट!

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)

[email protected]