
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱया लाटेमध्ये नागरिकांनी चांगली काळजी घेतली. प्रशासनाला सहकार्य केले. मात्र, काही निर्बंध शिथिल झाल्यानंतर निष्काळजीपणा वाढला आहे. यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. कोरोना रुग्णवाढ थांबवण्यासाठी सर्वांनी नियम पाळणे गरजेचे असून, गर्दी टाळण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा, आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याधिकारी सुरेश वाघ उपस्थित होते.
मंत्री थोरात म्हणाले, नागरिकांमध्ये वाढलेला निष्काळजीपणा अत्यंत चिंताजनक आहे. कोरोनाबरोबरच डेंग्यू आणि चिकुनगुनियाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्ण जास्त असलेल्या गावांमध्ये ग्राम दक्षता पथक सक्रिय करा. विविध सणांमुळे होणारी गर्दी चिंताजनक आहे. गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, वीसपेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेल्या गावांमध्ये लॉकडाऊन करा. अशा गावांसाठी पाच कर्मचाऱयांची तातडीने नियुक्ती करा. सणांमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्बंध लावा. प्रशासन गाव, तालुका व जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी नियम करणार आहे, त्याची अंमलबजावणी सर्वांनी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
























































