डॉ. रविंद्र सिंगल यांच्या सायकल शर्यतीतील अनुभवावरील पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैधमापन शास्त्र नियंत्रक डॉ. रविंद्र सिंगल यांच्या सायकल शर्यतीवरील अनुभवांचे संकलन असलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे करण्यात आले.

डॉ. सिंगल यांनी 2017 मध्ये पुणे ते गोवा डेक्कन क्लिफ हँगर या 643 किलोमीटरच्या सायकलींगच्या शर्यतीमध्ये भाग घेतला होता. ही शर्यत अतिशय खडतर होती. तसेच विशिष्ट कालमर्यादेत ती पूर्ण करणे अतिशय आवश्यक होते. त्याकरीता मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती तसेच सराव क्रमप्राप्त होते. याकरिता डॉ सिंगल यांनी 6 महिने प्रशिक्षण घेतले. त्यांनी 4 नोव्हेंबर 2017 रोजी प्रत्यक्षात शर्यतीत भाग घेतला. त्यांच्याबरोबर इतर काही प्रतिस्पर्धी होते, परंतु मानसिक व शारीरिक थकव्यामुळे काहींनी शर्यत मध्येच सोडून दिली. तथापि, डॉ. सिंगल यांची मानसिक तयारी असल्याने ही शर्यत वयाच्या पन्नाशितही त्यांनी पूर्ण केली.

या शर्यतीचा 643 किलोमीटरचा सायकलवरील खडतर प्रवास करताना शारीरिक व मानसिक क्षमतांचा पूर्ण कस लागला. तो प्रवास तरुणांचे मनोधैर्य व मनोबल उंचावण्याकरीता नक्कीच प्रेरणादायी ठरावा, म्हणून डॉ. सिंगल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. वैशाली बालाजीवाले या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. पुस्तक प्रकाशनप्रसंगी कामगार प्रधान सचिव विनिता वेद सिंगल देखील उपस्थित होत्या.