
राजापूर तालुक्यातील जैतापूर- दळे येथे आंबा बागेत काम करणाऱ्या तीन गुरख्यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या तिघांनीही आंबा फवारणीमध्ये आंब्याच्या साईज वाढीसाठी वापरण्यात येणारे जीओ सॉलव्हंट नावाचे औषध प्राशन केल्याने त्याची विषबाधा होऊन या तिघांचाही मृत्यु झाल्याची माहिती नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली आहे. तीन गुरख्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. तालुक्यातील दळे येथील सलीम काझी यांच्या बागेत हे तिन्ही गुराखी काम करत होते.
आंबा बागेतील निर्मलकुमार ऐनबहाद्दुर ठाकूरी (38 ) याचा नाटे येथून अधिक उपचारासाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथेच मृत्यु झाला. दिपक व गोविंद या दोन जणांचा उपचारासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल केल्यावर मृत्यु झाला आहे. रविवारी रात्री 9 ते 1 या चार तासात पाठोपाठ या तीनही गुरख्यांचा मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर तात्काळ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपविभागिय पोलीस अधिकारी निवास साळोखे, राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे.
निर्मलकुमार ऐनबहाद्दुर ठाकूरी हा रविवारी कामानिमित्त रत्नागिरीत गेला होता. दुपारनंतर तो दळे येथे बागेत परतला. मात्र त्याची तब्येत बिघडल्याने त्याला नाटे येथील एका खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले, मात्र तेथून त्यांनी त्याला अधिक उपचारासाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.निर्मलकुमार ऐनबहाद्दुर ठाकूरी याच्यासोबत रहाणाऱ्या त्याच्या गोविंद व दीपक या आणखी दोन सहकाऱ्यांची प्रकृती देखील अचानक बिघाडल्याने त्यांना उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले. मात्र या दोघांचाही जिल्हा शासकिय रूग्णालयात मृत्यु झाला आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे. गोविंद व दिपक हे 32 ते 33 वर्र्ष वयाचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.पोलीसांनी आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद केली असून अधिक तपास आबासाहेब पाटील करत आहेत.
























































