
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका, ते अशा शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरत असतात. असे सांगताना अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच अजित पवारांसोबत आमच्या रडारवर केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाही, तर काँग्रेसदेखील आहे. येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्या बडय़ा दोन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे जाहीर करणार आहोत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुण्यातील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी खास करून हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले की, कायद्याची लढाई कायद्याने लढा. कायद्याची लढाई कोल्हापुरी चप्पलने लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोपं आहे; पण, ईडीला तोंड देणे कठीण आहे. तोंडाला फेस येईल. तुमच्या कारखान्यात 98 कोटी कोठून आले आहेत. त्या कंपन्या कुठे आहेत. कोलकाताच्या कंपन्यांनी कोल्हापूरच्या सेनापती घोरपडे कारखान्यात कशी काय गुंतवणूक केली, याची उत्तरे मुश्रीफ यांनी द्यावीत. मुश्रीफांनी पॅनिक होऊ नये, शांत राहून काम करावे, असा सल्लाही पाटील यांनी यावेळी दिला.




























































