
कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यादृष्टिकोनातून मुंबई महापालिकेसह इतर स्वयंसेवी संघटनांनीदेखील लसीकरण मोहीम आयोजित करण्यावर भर दिला आहे. या मोहिमेला उत्स्फूर्द प्रतिसाद मिळत आहे. माझगाव येथे झालेल्या लसीकरण मोहिमेत तब्बल 5900 जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून कांदिवलीत खास रिक्षाचालकांसाठी लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती.
माझगाव येथील प्रभाग 210मध्ये सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव यांच्या सूचनेनुसार व मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने व स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर व शिवसेना माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नाने लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत एकूण 5900 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. या वेळी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, संजय म्हशिलकर, बबन गावकर, सूर्यकांत पाटील, विजय लिपारे, स्वप्नील बागवे, श्रद्धा वाघमारे, हेमंत मयेकर, रॉनी बगवाडिया, जेठालाल राठोड, जगदीश नलावडे, एच.एन. रिलायन्स फाउंडेशनचे डॉ. संदेश कठारे, अरीश मुरलिधरन, डॉ. शैलेंद्र पोळ, डॉ. सोनिया कदम आदी उपस्थित होते.
तर कांदिवली येथे परिवहन मंत्री, विभाग प्रमुख अनिल परब, नगरसेवक एकनाथ (शंकर) हुंडारे, रिक्षा सेनेचे सरचिटणीस राजेंद्र देसाई यांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या वेळी महानगरपालिका डॉ. बनसोडे, डॉ. स्नेहल सावंत, मनोज मसुरकर, राजेश सलेकर, नेताजी माने, हर्षद केसरकर, दीपक शिंदे, पिंकी पाटोळे, हल आसमीन पठाण आदी उपस्थित होते.
























































