पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वरळीतील विकासकामांचे भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळी परिसरात मोठय़ा प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या विकासकामांचे भूमिपूजन पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी मुंबईत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेली विकास आणि पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश आदित्य ठाकरे यांनी दिले.

वरळी परिसरातील नेहरू सायन्स सेंटर जंक्शन, फिनिक्स मुंबई माईल फ्लायओव्हरखालील जागा, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सयानी रोड, गोखले रोड, ऍनी बेझंट रोडवरील सौंदर्यीकरण आणि फुटपाथच्या कामांचे तसेच सर पोचखानवाला रोड व खान अब्दुल गफार खान रोडला जोडणाऱया पायवाटेच्या (हिलटॉप लेन) सौंदर्यीकरण व नूतनीकरणाच्या कामांचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांना आजपासूनच सुरुवात होत आहे. यावेळी नगरसेविका स्नेहल आंबेकर, समाधान सरवणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, महापालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते. ही कामे राज्य शासन, मुंबई महानगरपालिका यांच्या निधीसह फिनिक्स मिल्स, आदित्य बिर्ला ग्रुप यांच्या सीएसआर निधीमधून करण्यात येणार आहेत. या कामांची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती घेतली. या परिसराचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करताना टाकाऊ पदार्थांपासून सुंदर कलाकृती निर्माण करून त्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यांचीही पाहणी करून आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले.