पंजाब किंग्जचा दीपक हुडा इन्स्टाग्रामवरील फोटोमुळे अडचणीत, बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी युनिट करणार चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी रात्री पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयपीएलमधील लढतीत राजस्थानने बाजी मारली. पंजाबच्या पराभवाचे खापर हे दीपक हुडावर फोडण्यात आले. त्यातच दीपक हुडाने मंगळवारी दुपारी सोशल मीडियावर स्वतःचा फोटो टाकल्याने तो अडचणीत सापडला आहे. कारण बीसीसीआयचे भ्रष्टाचारविरोधी पथक (एसीयू) हे त्या सोशल मीडियावरील पोस्टची चौकशी करणार आहे.

बीसीसीआय शब्बीर हुसेन शेखादम खंडवावाला यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी युनिट सध्या यूएईमध्ये खेळल्या जाणाऱया आयपीएलवर बारीक लक्ष ठेवून आहे. पंजाब किंग्जचा फलंदाज दीपक हुडाने मंगळवारी दुपारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा फोटो पोस्ट केल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. बीसीसीआय आता दीपक हुडा याने केलेल्या पोस्टची चौकशी करणार आहे. ही पोस्ट भ्रष्टाचारविरोधी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करते की नाही हे शोधले जाणार आहे. त्यामुळे दीपक हुडाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

खेळाडूंसाठी मार्गदर्शक तत्त्वे

क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरील मेसेजवर प्रतिक्रिया कशी द्यावी याबद्दल काही नियम आहेत. याबाबत माहिती देताना एसीयूचे अधिकारी म्हणाले, ‘काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आहेत.’ माजी प्रमुखांनी असेही स्पष्ट केले की, पीआर हे संघ व खेळाडूंची काही सोशल मीडिया अकाऊंट हाताळत असतात. मात्र खेळाडूंनी त्यांच्या बाजूने कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते.

काय आहे हुडाची पोस्ट?

दीपक हुडा अडचणीत सापडलेली पोस्ट त्याच्याच फोटोची आहे. दीपक या फोटोत पंजाब संघाची जर्सी घालून हेल्मेट चढवत आहे. ज्याला त्याने कॅप्शन दिले आहे की, ‘आम्ही येतोय पंजाब किंग्ज. पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स. आयपीएल 2021. आपलं पंजाब.’ ही पोस्ट त्याने 21 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता टाकली. सामना सुरू होण्याआधी बराच काळ ही पोस्ट त्याने केली होती. ज्यामुळे या पोस्टमधून तो सामन्यात खेळणाऱया अंतिम 11 खेळाडूंमध्ये असल्याचे स्पष्ट होतेय. हे आयपीएल आणि बीसीसीआयच्या नियमांविरुद्ध असल्याने दीपकची चैकशी होणार आहे.