‘एमओए’चा आर्थिक स्वायत्ततेचा निर्धार; अध्यक्ष अजित पवार, सचिव नामदेव शिरगावकर संघटनेचा दर्जा उंचावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक वर्षांपासून सुस्तावलेली महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना (एमओए) आता कात टाकणार आहे. कारण ‘एमओए’ला आर्थिक स्वायत्तता मिळवून देण्याचा निर्धार सलग तिसऱयांदा फेरनिवड झालेले अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. सर्वांना विश्वासात घेऊन ‘एमओए’चा दर्जा उंचावण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करावे लागणार आहे, असे नवनिर्वाचित सचिव नामदेव शिरगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

क्रीडा संपुलांसाठी निधी वाढवला

अजित पवार यांनी क्रीडा संकुलासाठी निधी वाढवल्याची माहिती आपल्या भाषणात दिली. ते म्हणाले, तालुका क्रीडा संकुलाचा निधी एक कोटी रुपये होता तो आता 5 कोटी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा क्रीडा संकुलासाठी 8 ऐवजी 25 कोटी आणि विभागीय क्रीडा संकुलासाठी 24 ऐवजी 50 कोटी रुपये निधी वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन हे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथेच होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढण्यासाठी खेळासाठीच्या पायाभूत सुविधा, खेळाडूंना अत्याधुनिक साहित्य आणि प्रतिभावान प्रशिक्षक देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाहीही अजित पवार यांनी दिली.

मिनी ऑलिम्पिक व्हायला हवे

मिनी ऑलिम्पिक होणारच अशी दरवर्षी ‘एमओए’कडून गर्जना होते, मात्र दुर्दैवाने गेल्या 28 वर्षांपासून ही स्पर्धा होऊ शकली नाही. मात्र आता मिनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही लवकरात लवकर तयारीला लागू, अशी ग्वाही एमओएचे नवनिर्वाचित सचिव नामदेव शिरगावकर यांनी दिली. राज्यातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

खजिनदारपद 2-2 वर्षे

शुक्रवारी (दि. 24) मार्पेटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात ‘एमओए’च्या निवडणुकीची औपचारिकता पार पडली. कारण 18 सप्टेंबर रोजीच महाराष्ट्रातील या शिखर संघटनेची निवडणूक बिनविरोध निश्चित झाली होती. केवळ खजिनदारपदाचा तिढा तेवढा सुटला नव्हता. त्यामुळे या पदासाठी ज्युडो संघटनेचे धनंजय भोसले व खो-खो संघटनेचे चंद्रजित जाधव यांच्यात दुरंगी लढत झाली. यात धनंजय भोसले यांना झालेल्या एकूण 43 पैकी 39 मते मिळाली, तर चंद्रजित जाधव यांना दोन मते मिळाली आणि दोन मते बाद झाली. मात्र मतदानापूर्वीच धनंजय भोसले आणि चंद्रजित जाधव यांचे मनोमिलन होऊन दोघांनी दोन-दोन वर्षे खजिनदारपद विभागून घेण्याचा निर्णय घेतला.

नवीन नियमावली, पारदर्शक काम

पत्रकारांशी संवाद साधताना नामदेव शिरगावकर म्हणाले, देशाच्या ऑलिम्पिक समितीवर दोन टर्मपासून काम करतोय. त्यामुळे विविध समित्यांवर काम करण्याची मला संधी मिळाली. त्या अनुभवाच्या जोरावर महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करीन. क्रीडा संघटनांमधील वाद संपुष्टात येण्यासाठी नवीन नियमावली तयार केली जाईल, नियमावलीत पारदर्शकता आणली जाईल. त्यामुळे संघटनांमधील वाद कोर्टात जाण्यापूर्वीच मिटविण्यासाठी प्रयत्न केले जाईल. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आगामी चार वर्षांत काय करणार याबाबतची योजना लवकरच तयार केली जाईल. खेळाच्या संघटनेची स्वायत्तता अबाधित राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

‘एमओए’ची कार्यकारिणी (2021-2025)

  • अध्यक्ष – अजित पवार (कबड्डी)
  • वरिष्ठ उपाध्यक्ष – बाळासाहेब लांडगे (कुस्ती)
  • उपाध्यक्ष – प्रदीप गंधे (बॅडमिंटन), अशोक पंडित (नेमबाजी), जय कवळी (बॉक्सिंग), संजय शेटे (जिम्नॅस्टिक).
    सचिव – नामदेव शिरगावकर (मॉडर्न पेंटॅथलॉन).
  • सहसचिव – धनंजय कुमार (ट्रायथलॉन), प्रकाश तुळपुळे (टेबल टेनिस), प्रशांत देशपांडे (तिरंदाजी), सुंदर अय्यर (टेनिस).
  • खजिनदार – अॅड. धनंजय भोसले (ज्युदो).
  • सदस्य – स्मिता यादव (रोइंग), अभय छाजेड (अॅथलेटिक्स), दीपक मेजरी (जलतरण), उदय डोंगरे (फेन्सिंग), गोविंद मुथुकुमार (बास्केटबॉल), राजाराम राऊत (हॅण्डबॉल), नीलेश जगताप (व्हॉलीबॉल), सोपान कटके (वुशू), संदीप चौधरी (रग्बी).