
सोलापुरातील एका बेरोजगार तरुणाची ‘नोकरी डॉट कॉम’ या वेबसाईटच्या नावाने बायोडाटा अपडेट करण्याचा बहाणा सांगत ऑनलाइन 92 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर नवनाथ गायकवाड (रा. अवंतीनगर, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अनन्या शर्मा नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर गायकवाड याला मोबाईलवरून अनन्या शर्मा नावाच्या महिलेने पुण्यातील ‘नोकरी डॉट कॉम’ कंपनीच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगत बायोडाटा अपडेट झाला आहे. 10 रुपये ऑनलाइन भरावे लागतील, असे सांगून लिंक पाठविली. गायकवाडने डेबिट व क्रेडिट कार्डवरून पैसे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली असता ट्रान्झॅक्शन होत नसल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळाने त्याच्या बँक खात्यातून 9 हजार 978, 10 हजार रुपये, क्रेडिट कार्डमधून 24 हजार 240 रुपयांचे तीन ट्रान्झॅक्शन झाल्याचे मेसेज आले. बँक व क्रेडिट कार्डमधून गायकवाडचे 92 हजार 270 रुपये परस्पर काढून घेण्यात आले. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भालचिम अधिक तपास करीत आहेत.



























































