
सिटी बँकेच्या आर्थिक घोटाळ्याशी आपला कोणताही संबंध नाही. केवळ राजकीय प्रतिस्पर्ध्याच्याविरोधात जातपडताळणी प्रमाणपत्राची तक्रार केल्यामुळे राजकीय सुड उगवण्यासाठी ईडीद्वारे आपल्याविरुद्ध कारवाई केली जात आहे असा दावा करत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली.
तब्बेत ढासळल्यामुळे आपण रुग्णालयात उपचार घेत असून न्यायालयाने तूर्तास दिलासा द्यावा अशी मागणी आनंदराव अडसूळ यांनी केली आहे. या याचिकेवर उद्या शुक्रवारी सुनावणी होणार असून न्यायालयाने अडसुळांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सिटी बँकेतील पैसे बिल्डरांना अवैधरित्या वाटण्यात आले. त्यात अडसूळ यांनी 20 टक्के कमिशन घेतले हा घोटाळा जवळपास 980 कोटींचा असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. या आरोपावरून बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचनालयाकडून तपास केला जात आहे.




























































