
>> श्रीकांत पवनीकर
उत्तराखंडमधील उत्तरकाशी हे महत्त्वाचं ठिकाण. गंगेचं सान्निध्य लाभलेल्या, तिच्या अस्तित्वाने पवित्र झालेल्या उत्तरकाशीवर निसर्गानेही भरभरून उधळण केली आहे. या देवभूमीचं पौराणिक महत्त्व जाणून घेताना तिथली मंदिरं, घाट, पर्वतांचं सान्निध्य, गंगेचा काठ आणि सोबतीला असलेली नीरव शांतता आपल्याला अलौकिक अनुभव देतात.
‘नेताला’! वाहत्या गंगेच्या अरुंद किनाऱ्यावर असलेले व एकांतात वसलेले जणू काही गोष्टीतले गावच! अत्यंत आकर्षक रंगीबेरंगी अशा तीनमजली गेस्ट हाऊससोबतच टेंटची व्यवस्थासुद्धा गंगेच्या किनारी आहे. रात्री टॉर्च व टेंटच्या मंद प्रकाशात अगदी जवळून खळाळत वाहणारी व हॉटेलच्या प्रकाशाचा झोत अंगावर घेणारी गंगा कुणी क्वचितच ‘नेताला’ या गावी बघितली असेल. गंगेच्या प्रवाहाचा धीरगंभीर ध्वनी रात्रीच्या अंधाराला चिरत जातो व अंगावर रोमांच उभे करतो. रात्रीच्या सुरम्य वातावरणात व गंगेच्या परिसरात रात्री खुर्च्या टाकून निवांतपणे बसण्याचे व काहीशा एकांत वातावरणात राहण्याचे भाग्य क्वचितच कुणाला लाभले असेल. हे आमचे सुदैव की, याचे आम्ही साक्षीदार होतो. तसे बघितले तर नेताला हे गावसुद्धा नाही. हा आहे गंगोत्रीचा अतिशय विलोभनीय, पण विरळ वस्ती असणारा ‘बेस कॅम्प’. संपूर्ण हिमालयाच्या प्रवासामध्ये इतके सुंदर व अप्रतिम ठिकाण बघण्यात आलेले नाही. वनराजी व ओमकारांच्या ध्वनीने सतत वाहणारी गंगा दऱयाखोऱ्यांतून प्रवास करून उत्तरकाशीला मंदावते व आपण नचिकेताच्या प्रदेशात नतमस्तक होते.
कोण हा बालक नचिकेता? पुराणकाळातील परंपरेने चालत आलेले एक उत्तरकाशीतील अद्भुत पात्र! उत्तरकाशीचा स्वामी! उद्दालक ऋषीचा एकुलता एक पुत्र! यमराजाला जिवंतपणी भेटण्याचे महद्भाग्य केवळ दोनच व्यक्तींना लाभले. एक म्हणजे सावित्री व दुसरा नचिकेता. पतिनिधनानंतर सावित्रीला जिवंतपणी यमराजाला भेटून व मृत्यूच्या दाढेतून सत्यवानाला सोडवल्याची कथा प्रसिद्ध आहे. यमपुरीच्या प्रवेशद्वारावर नचिकेतानेसुद्धा तीन दिवस मुक्काम केला व यमराजाला यमपुरीमध्ये जिवंतपणी भेटण्याचे भाग्य नचिकेता या बालकाला लाभले ते वडिलांच्या रागावर. ‘विश्वजित’ यज्ञात उद्दालक ऋषी चांगल्या गाईऐवजी निरुपयोगी भाकड गाई दान करत असल्याचे बघून नचिकेताला वाईट वाटले. वडील चांगल्या गाई दानात देत नव्हते. वडिलांचा हा गाईंचा मोह त्याला आवडला नाही. ‘‘तुम्ही मला कुणाला दान करणार?’’ असा प्रश्न वडिलांना नचिकेताने केला. या नेहमीच्या प्रश्नाने वैतागलेल्या उद्दालक ऋषींनी रागाने, “मी तुला यमपुरीतल्या यमराजाला दान करतो’’ असे म्हटले. ही वडिलांची आज्ञा मानून या बालकाने यमराजाचा शोध घेत यमपुरीचा सरळ रस्ता धरला तो याच उत्तरकाशीतून. या अद्भुत निरागस बालकाला बघून यमराज प्रसन्न झाले. मृत्यूच्या राज्यात राहून मृत्यूच्या देवतेकडूनच परमसत्याचे व आत्म्याचे व मृत्यूचे ज्ञान नचिकेताने यमराजाकडून घेतले. नचिकेता परत उत्तरकाशीच्या या आश्रमात परत आला. “मृत्यूनंतर पुढे काय?’’ आत्म्याचे पुढे काय होते? याचे ज्ञान नचिकेताला झाले होते. यात नचिकेताची अनासक्ती गौरवलेली आहे. येथे नचिकेताच्या आश्रमाची जागा अजूनही आहे व भरपूर वेळ असल्यास बघता येते. येथे नचिकेताचे सरोवरसुद्धा आहे. हे सरोवर उद्दालक ऋषींनी निर्माण केले आहे. आजसुद्धा तेथे अज्ञात ऋषीमुनीचे अस्तित्व असते असे कळले. क्वचितच कुणी तेथे जातात. पॅकेज टूरमध्ये इतका वेळ नसतो. या भूमीवर त्याच्या नामोच्चाराचा सतत ध्वनी ऐकणे हाच पवित्र अनुभव आहे. नचिकेताचे शारीरिक अस्तित्व या पवित्र भूमीवर प्रकट झाले व ‘आध्यात्मिक ज्ञानाची भूमी’ म्हणून हा प्रदेश प्रसिद्ध झाला. सावित्रीला व ‘वटपौर्णिमा’ या पारंपरिक सणाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली, पण नचिकेता उपेक्षितच राहिला. या परिसरात असलेल्या वारणावत पर्वताच्या पायथ्याशी मुनीश्री नचिकेता थोडे विसावले आणि कायम इथलेच होऊन राहिले, पण नंतर हळूहळू ते सुवर्णयुग संपले.
वाराणसी म्हणजे आधुनिक बनारसला जसे विश्वनाथाचे मंदिर आहे, त्याप्रमाणे येथेही विश्वनाथासारखे देव मनकर्णिका हे पुरातन मंदिर आहे, पण आज आधुनिक बनारस ऐषाराम व भौतिक सुखात दंग आहे. भौतिकवादाने पछाडलेले आहे. सत्तेचे व दिखाऊपणाचे अशांत जीवन इथले साधू जगत असतात, पण उत्तरकाशी हे साधे, जुन्या वळणाचे व भौतिकवादाने अकलंकित असे अतिपुरातन व अलौकिक धार्मिक खेडेच आहे. येथे सर्वच लोक प्रचंड धार्मिक वृत्तीचे साधेभोळे व सलोख्याने राहणारे दिसले. पहाडी लोकांची आपल्या ग्रामदेवतेवर प्रचंड श्रद्धा व भक्ती असते. दिखाऊपणाचा स्पर्श पण जाणवला नाही. इथले तपस्वी पर्वतांच्या गुहेत व आश्रमामध्ये समाधीसारख्या नीरव शांततेत कालक्रमण करीत असलेले दिसले. याच तपस्वींमध्ये परमगुरू स्वामी तपोवनजी महाराज हेसुद्धा होते. परमपूज्य स्वामी चिन्मयानंदांचे गुरू. दोघेही अध्यात्म्याच्या ज्ञानाचे धनी. त्यांना खरे ज्ञान हिमालयाच्या अनुभवातूनच मिळाले. रमणीय हिमालयाच्या प्रदेशातले हे एकांतमय शांत मैदान. अद्भुतच! अलौकिक दैवी सौंदर्य! हिलाच ‘सौम्य काशी’ पण म्हणतात! उत्तरकाशीचा हा ईश्वर विश्वनाथाच्या रूपाने शाश्वत समाधीमध्ये एकांतात व नीरव शांततेत विश्रांती घेत आहे. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे पुरातन विश्वनाथ मंदिर. प्राचीन महादेव मंदिर. तशी अनेक आकर्षक स्थळे येथे आहेत. मंदिरात प्रवेश केल्याबरोबर एक विचित्र भारावलेपण शरीरात प्रवेश करते. मंद असा स्तोत्रध्वनी वातावरणाचे गांभीर्य वाढवत होता. हे मंदिर भगवान परशुराम यांनी स्थापन केल्याची मान्यता आहे. महर्षी जमदग्नी हे पत्नी रेणुकामातेच्या समवेत या परिसरात राहत होते. सुदर्शनशहाची पत्नी महाराणी कांतीने या मंदिराचा जीर्णोद्धार 1857 ला केल्याची माहिती दिसली. प्रत्यक्ष भागीरथाच्या तपस्येचे ठिकाणसुद्धा हेच आहे असेही येथे कळले. संख्याशास्त्राचे महान कर्ते कपिलमुनी यांचा आश्रमसुद्धा येथून एकदीड मैलावर होता असेही मंदिर व्यवस्थापनाकडून कळले. या भारावलेल्या मंदिरात जागृत शिवलिंगासमोर शिवमहिम्नस्तोत्र व इतर पाठ केलेत, पण या महादेव मंदिरातून पायच निघत नव्हता. आता स्तोत्रपठण थांबले होते. मंदिरातून निघताना घंटी वाजवली. एक पवित्र नाद निर्माण झाला. त्यातून ‘ओम’चे ध्वनी निघाले.
हिमालयाच्या शिखरांमधले असलेले विश्वनाथांचे हे पुरातन मंदिर. शीतल छाया, बालखिल्य व वारणावत पर्वतांचे सान्निध्य. सोबतीला गंगेचा काठ. काहीशा दूरवर असलेल्या नचिकेताच्या स्थानावरच्या मंगल स्मृती. उद्दालक ऋषी यांनी निर्माण केले नचिकेताचे सरोवर व प्राचीन महान ऋषींचे व त्यांच्या स्मृतींचे सान्निध्य असलेली भूमी म्हणजेच उत्तरकाशी. स्वर्गीय व अलौकिक सौंदर्य लाभलेली रमणीय निर्जन वनश्री बघून डोळे दिपून गेलेत. परमेश्वरप्राप्तीकरिता यापेक्षा योग्य व स्वर्गीय जागा कुठे असेल!




























































