
अकोले तालुक्यातील अगस्ती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कुंभेफळ गावातील शिवारातून सुमारे साडेचार एकर ऊस अचानक आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांकडून प्रसंगावधान राखून वेळेत मदतकार्य केल्याने सभोवतालच्या अन्य क्षेत्रातील सुमारे 40 एकर ऊस क्षेत्र आगीतून वाचविण्यात यश मिळाले. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.
अकोले तालुक्यातील कुंभेफळ हे गाव प्रवरा नदीपात्रालगत असल्याने मोठे बागायत क्षेत्र आहे. यामुळे ऊस क्षेत्रही मोठे आहे. गावच्या खोलवाट नामक शिवारातून गावकऱ्यांना आकाशात काळा धूर व पाठोपाठ आगीचे लोळ येताना दिसले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावातील लोकांनी खोलवाट शिवाराकडे धाव घेतली. तेथील ऊस क्षेत्रात आग लागून ऊस जळताना दिसत होता. उपस्थितांनी अगस्ती साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली. काही वेळातच अग्निशामक बंबाने घटनास्थळी धाव घेतली, पण शिवारातील अरुंद रस्त्यावरून मदतकार्य करण्यात अडचणी येत होत्या. तरीही आगीतून ऊस वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरूच होते. आबा कोटकर, माणिक पांडे, प्रवीण कोटकर, अक्षय कोटकर आदी शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीवरील विद्युतपंप चालू करून मिळेल त्या साधनाने पाटातून वाहते पाणी उपसून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही काळानंतर आग आटोक्यात आली. मात्र, आडसाली व पूर्वहंगामी ऊस मिळून सुमारे 4 एकर 20 गुंठे शेतातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तर, लगतच्या क्षेत्रावरील सुमारे 35 ते 40 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश मिळाले.
अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, संचालक मीनानाथ पांडे, केन मॅनेजर सयाजी पोखरकर, वैभव देशमुख, संपत फोडसे, देवचंद वाळुंज यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.


























































