
नाशिकजवळ बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीच्या मृत्यूला तीन दिवस उलटत नाही तोच येथून अवघ्या पाच-सहा किलोमीटर अंतरावरील दिंडोरी तालुक्यातील धागूरमध्ये रविवारी रात्री आणखी एक दुर्घटना घडल्याने जिल्हावासीय हादरले. येथे बिबट्याने चारवर्षीय मुलीवर हल्ला चढवला. वनविभागासह ग्रामस्थांनी मध्यरात्रीपर्यंत परिसर पिंजून काढला. मात्र, शोध लागला नव्हता. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मुलीच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्याने सर्वजण सून्न झाले.
दिंडोरी तालुक्यातील धागूर येथे विलास बाळासाहेब माळी यांच्या शेतात गुजरात राज्यातील काही मजूर कामासाठी आले आहेत, ते तेथेच लेबर शेडमध्ये राहतात. रविवारी रात्री सात वाजेच्या सुमारास शेतमजूर विठ्ठल वड यांची चारवर्षीय मुलगी रितीका ही आईसोबत शेडबाहेर थांबलेली होती. अचानक सोयाबिनच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलीवर हल्ला चढवून तिला उचलून धूम ठोकली. आईसह इतर मजुरांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती कळताच दिंडोरी वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी व पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी ग्रामस्थांसोबत मध्यरात्री साडेबारापर्यंत शोध घेतला. मात्र, अंधारामुळे अडचणी आल्याने मुलीला शोधण्यात अपयश आले. सकाळी सात वाजता पुन्हा शोध सुरू करण्यात आला. नाशिक रेंजचे पथकही मदतीला पोहचले. बिबट्याच्या पावलांच्या ठशांचा माग घेत साडेनऊ वाजता घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावरील शेतात मध्यभागी मुलीच्या मृतदेहाचे तुकडे दिसल्याने सगळेच हादरले. चिमुकलीला गमवावे लागल्याने आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दोन पिंजरे लावले
धागूर व परिसरात वनविभागाने दोन पिंजरे लावले आहेत. गस्तही वाढवली असून, ट्रॅप कॅमेर्यांद्वारे परिसरावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. 30 सप्टेंबरला गिरणारेजवळ वडगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला. त्या घटनास्थळापासून हा धागूर परिसर पाच-सहा किलोमीटर अंतरावरच असल्याने बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.




























































