
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या पर्वाला दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरुवात होणार आहे. 22 डिसेंबरपासून बंगळुरू येथे या मर्दानी खेळाच्या सामन्यांचा थरार सुरू होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नसल्याने टीव्हीवरच या सामन्यांची मजा घ्यावी लागणार आहे.
प्रो-कबड्डी लीगचे आयोजक ‘मशाल स्पोर्ट्स’ने दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंना कोरोना होऊन स्पर्धेचा खेळखंडोबा होऊ नये म्हणून प्रेक्षकांना परवानगी नाकारली आहे. 2019 नंतर कोरोनाच्या संकटामुळे ही लीग होत नव्हती. 2021 च्या सुरुवातीला सामने होणार होते, मात्र पुन्हा कोरोनाच्या संकटामुळेच ही स्पर्धा स्थगित करावी लागली. आता सुरक्षेची सर्व काळजी घेऊन या स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
बंगळुरूमध्ये होणार सामने
प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या पर्वासाठी आधी अहमदाबाद आणि जयपूर या शहरांचा विचार करण्यात आला होता. मात्र अखेर बंगळुरूला यजमानपद सोपवण्यात आले आहे. सर्व कोरोनासंबंधी नियमांचे पालन करून बायो-बबलच्या नियमांनुसार हे सामने पार पडणार आहेत. यंदा या लीगमध्ये 12 संघ समाविष्ट होणार आहेत. ऑगस्टमध्येच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. प्रदीप नरवाल हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला. यूपी योद्धा संघाने त्यासाठी तब्बल 1 कोटी 65 लाख रुपये मोजले.




























































