
बीड जिह्यातील अंबाजोगाई या क्षेत्रातील देवी म्हणजे योगेश्वरी होय. योगेश्वरीचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे आहे. खांबावरचे नक्षीकाम नाजूक आहे. उत्तरेच्या दरवाजाजवळ सर्वेश्वर तीर्थ आहे. पश्चिमेच्या दरवाजाजवळ इतर देवदेवता स्थापन केल्या आहेत. विजयादशमी, मार्गशीर्ष पौर्णिमेला येथे उत्सव असतो. मंदिराचा जीर्णोद्धार इ. स. 1720 मध्ये नागोजी त्रिमल व श्यामजी बापूजी यांनी केला. मूर्ती तांदळा रूपात आहे. तांदळाची उंची तीन फूट व रुंदी दोन फूट आहे. मातेची मूर्ती शेंदूरचर्चित आहे. देवीचा कुंकुमतिलक विशेष प्रकारचा आहे. तिच्या कानात मत्स्यभूषणे आहेत. तिने केसात चांदीची केवडय़ाची वेणी माळली आहे. जवळच महाकाली व तुळजा भवानी आहेत. पश्चिमेस रुद्रभैरव व महारुद्र ही मंदिरे आहेत. योगेश्वरी ही चौसष्ट योगिनींची प्रमुख देवता आहे. तिचे त्रैलोक्य-विजय नावाचे कवच प्रसिद्ध आहे.



























































