
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या खटल्यावरील सुनावणीला लवकरच सुरुवात होणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव पाहता या खटल्यावर नियमित सुनावणी येरवडा मध्यवर्ती कारागृहात किंवा जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात होणार आहे. या दोन्हींपैकी एक जागा निश्चित केली जाणार आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणात वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सीबीआयने पुराव्यासंबंधातली कागदपत्रे सादर केली. घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदनपूर्वीचा पंचनामा, फॉरेन्सिक लॅबमधील अहवाल अशी तेरा कागदपत्रे सादर करण्यात आली, मात्र ही कागदपत्रे बचाव पक्षाच्या वकील सुवर्णा आव्हाड वत्स यांनी नाकारली. तसेच ऍड. वत्स यांनी युक्तिवाद करताना न्यायाधीशांना सांगितले की, आरोपींना त्यांच्या वकिलांशी व कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी मुभा द्यावी. न्यायालयाने ऍड. वत्स यांची ही मागणी मान्य केली. सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी ही कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची यादी देण्यासाठी मुदत देण्याची विनंती न्यायाधीशांना केली. दरम्यान, न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी तहकूब केली असून सीबीआयला साक्षीदारांची यादी सादर करून पुराव्यासंबंधी कागदपत्रे सिद्ध करावी लागणार आहेत.
























































