
>> मंगल गोगटे
एअरगन समर्पण करण्याची एक चळवळ अरुणाचलमध्येच सुरू झाली आहे. सरकारने ती पुढे नेण्याचंही ठरवलं आहे. या चळवळीअंतर्गत सुमारे 20 खेडय़ांतील 500 लोकांनी त्यांच्या बंदुका समर्पित केल्या आहेत. या चळवळीचं नामकरण ‘एअरगन समर्पण अभियान’ असं करण्यात आलं आहे आणि ही चळवळ आता चालूच राहणार आहे.
हिंदुस्थानच्या ईशान्येकडील भागातील इतर आदिवासी जमातींप्रमाणेच अदी ही जमात गेल्या अनेक पिढय़ा शिकारीवर अवलंबून आहे. तिथलीही लोकसंख्या हळूहळू वाढतच गेल्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून जास्त जास्त शिकार केली गेली आणि त्यानंतर याचा धोकादायक व भयानक परिणाम मात्र अलीकडे दिसू लागला. शेवटी त्याचा परिपाक म्हणून अनेकांनी त्यांची हवा-बंदूक (air gun) टाकून दिली. अर्थातच अदी लोकांसाठी ही मोठी क्रांती होती.
‘‘आमचे पूर्वज शिकारी होते आणि रानटी जनावरांची शिकार करणे हे आमच्या जीवनशैलीशी एवढं जोडलं गेलं आहे की, त्याचादेखील समारंभ केला जातो’’ 45 वर्षांचा सक्रियतावादी कार्यकर्ता एका आंतरराष्ट्रीय मासिकाला मुलाखत देताना म्हणाला. अरुणाचलमध्ये सगळ्यात मोठं जंगलाचं आवरण आहे. हे जगातल्या पर्यावरणीय जागांपैकी एक असून ही हिंदुस्थानातल्या जैवविविधतेसाठी अत्यंत चैतन्यशील जागा आहे. हिंदुस्थानात सर्वात जास्त दरडोई जंगल उपलब्धता इथेच आहे.
अदी लोकांसाठी, जे पक्के लढवय्ये आहेत, प्राण्यांना मारणं आणि खाणं किंवा विकणं हा जीवन पद्धतीचा एक भाग आहे. बंदूक हे पिढय़ान्पिढय़ा चालत आलेलं शस्त्र आहे, जे अभिमानाने बाळगलं जातं. आपल्या संविधानाने अरुणाचल प्रदेशमधील जमातींना काही खास हक्क व अधिकार दिले आहेत. उदाहरणार्थ, त्यांना जमिनीची मशागत करण्यासाठी जमीन बदलता येते. येथील आदिवासी लोकांसाठी स्थानिक कायदेदेखील आहेत – जे स्थानिक प्रथा व विधी यानुसार ठरतात, ज्यामुळे त्यांच्या जीवन पद्धतीवर मोठा परिणाम होतो. डोंगरी भाग आणि खडतर वाटांमुळे येथील आदिवासी जमाती विकासशील हिंदुस्थानपासून सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा वेगळ्या राहिल्या आहेत. इथल्या लोकांना वन्य प्राण्यांचे काही भाग विजयचिन्ह म्हणून मिरवायला आवडतात, परंतु अलीकडे ‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’च्या मदतीने अरुणाचल प्रदेश सरकारने निशी आदिवासी भागात प्राण्यांचे असे भाग फॅब्रिकेटेड सिंथेटिक्स मटेरियल्सपासून बनवायला आणि स्वस्तात विकायला सुरुवात केली आहे. या भागात 26 आदिवासी टोळ्या, त्यांच्या 110 उपजमातींसह त्यांची सांस्कृतिक ओळख जपत राहतात.
येथील वन्य जीवन वाचवण्यासाठी आणि काही वन्य प्राणी नाहीसे होण्यापासून वाचण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, हे येथील सरकारच्या लक्षात आले आहे. त्यासाठी पहिली गरज आहे ती लोकांना उदरनिर्वाहासाठी दुसरी काही संधी उपलब्ध करून देण्याची आणि त्याबाबतचे कडक कायदे असण्याचीही ! या जमातींचा शिकारीवरील पारंपरिक आणि सांस्कृतिक विश्वास कमी करण्यावर भर द्यायची गरज आहे. फक्त धरणं बांधून सुटण्यासारखा हा प्रश्न नाही, तर त्यासाठी शिक्षण व जागरुकता निर्माण करण्याचीही गरज आहे. अलीकडे झालेल्या पश्चिम बंगालमधील जंगल महाल अरण्यातल्या शेकडो वर्षे जुन्या ‘शिकार उत्सवा’त 200 पेक्षा जास्त वन्य प्राण्यांचा जीव गेला. हा त्या प्राण्यांच्या अस्तित्वावर आलेला घाला आहे. त्यामुळे वन्य जमातींचा शिकार हक्क आणि प्राण्यांचं रक्षण याच्यामध्ये कुठेतरी मार्ग निघतोय का हे पाहणं जरुरी आहे.
1972 मधील ‘वन्य जीवन (रक्षण) कायदा’ ही एक मोठी गोष्ट समजली जाते. शिकाऱ्याला शिकार केल्याबद्दल दंड आकारला जाऊ लागला. या कायद्याने वन्य जीवनाचं रक्षण झालं तरी त्यामुळे पारंपरिक शिकार हक्काला बेकायदेशीर ठरवलं.
नंतर मात्र एक आश्चर्य घडलं. काही जणांचं हृदयपरिवर्तन झालं. त्याचं असं झालं की, एअरगनमुळे चुकून काही पक्षी, प्राणी व माणसं मारली जाऊ लागली. सीरामच्या मते ही हिंसेला दिलेली निसर्गाची प्रतिक्रिया होती. तो विचार त्याच्या मनाला एवढा त्रास देऊ लागला की, त्याने हातातली बंदूक टाकून दिली. मग त्याने हा विचार पुढे न्यायचं ठरवलं. त्यासाठी त्याला अगदी जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा मिळाल्या, पण त्याने त्याची पर्वा न करता 10 वर्षे 300 खेडय़ांचा दौरा लोकांचं मन वळवण्यासाठी केला.
अलीकडे एअरगन समर्पण करण्याची एक चळवळ अरुणाचलमध्येच सुरू झाली आहे. सरकारने ती पुढे नेण्याचंही ठरवलं आहे. या चळवळीअंतर्गत सुमारे 20 खेडय़ांतील 500 लोकांनी त्यांच्या बंदुका समर्पित केल्या आहेत. या चळवळीचं नामकरण ‘एअरगन समर्पण अभियान’ असं करण्यात आलं आहे आणि ही चळवळ आता चालूच राहणार आहे.
























































