लेख – उघड पावसा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी  

यंदा पाऊस चांगला झाला तरीही देशातले काही जिल्हे आणि गावं या चार महिन्यांच्या जलधारांपासून वंचित राहिली. त्यांची काळजी घ्यायलाच हवी, पण एकूण पाऊस चांगला झाला. अनेक ठिकाणी समाधानकारक, पण काही ठिकाणी तर अतिवृष्टी आणि किनारपट्टीवरच्या प्रदेशात अतिअतिवृष्टीचाही तडाखा सहन करावा लागला. महाराष्ट्रापुरतं सांगायचं तर कोकणाला पुन्हा गतवर्षीप्रमाणेच वादळाचा प्रकोप सहन करावा लागला. चिपळूणसारख्या शहरांमध्ये अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली. सांगली, कोल्हापूरला अलमट्टीच्या पाण्याचा उपद्रव आणि कृष्णा-पंचगंगेकाठच्या वाडय़ावस्त्या नि बाजारपेठांमध्ये पाणी शिरण्याची दुर्धर आपत्ती गेली अनेक वर्षे ओढवतेय. मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस बेभरवशाने पडताना दिसतोय. या सगळय़ाची राज्य, देश आणि अगदी ‘ग्लोबल’ पातळीवर चर्चा होतानाही दिसतेय.

निसर्गाच्या लहरींना वेसण घालणं सोपं नाही, तर फारच कठीण आहे. अनेक वर्षे त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील. पूर्वी हिंदुस्थानात एक जूनला आलेला पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत काढता पाय घ्यायचा. महाराष्ट्रातला त्याचा मुक्काम 7 जूनच्या ‘मृग’ नक्षत्राच्या धारांनी सुरू व्हायचा तो 30 सप्टेंबरपर्यंत हस्त नक्षत्राच्या साक्षीने निरोप द्यायचा. ‘पुनरागमनायच’ म्हणजे पुन्हा पुढच्या वर्षी वेळेवर येण्यासाठी आळवणी केली जायची. ही आपली निसर्गाशी भावनिक नातं सांगणारी संस्कृती.

परंतु निर्हेतुक निसर्ग म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे. नैसर्गिक परिमाणांच्या आपोआप घडणाऱ्या घटनांमधून त्याचे विभ्रम अनुभवायला मिळतात. त्याचा शतकानुशतकांचा अभ्यास करूनच आपल्या शेतीप्रधान आणि मत्स्योद्योगात अग्रेसर असलेल्या देशातील जनसमूहांनी काही ठोकताळे बांधले. मला आठवतं त्यानुसार साठेक वर्षांपूर्वी आमची आजी ‘मृग’ नक्षत्र कधी लागतं ते विचारायची आणि पाऊस संपताना ‘हस्ता’चं पाणी परातीत जमा करायला सांगायची. सरत्या पावसाचे तृप्त करणारे जलबिंदू परसातल्या पाणवठय़ात पडले की, पुढे वर्षभर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही अशी समजूत. शहरी भागात हे पाणी घरातली पाण्याच्या टाकी किंवा पिंपात टाकायचं असं त्याचं कालानुरूप बदललेलं स्वरूप. आता ‘‘या कसल्या खुळय़ा समजुती! यामुळे काय होणार?’’ वगैरे म्हणणं सोपं. त्या केवळ ‘समजुती’ हे खरंच, पण त्या पावसाने केलेल्या उपकाराच्या कृतज्ञतेवर आधारल्या. आता तो काळ कधीच मागे पडला, पावसाची वैज्ञानिक ‘मॉडेल्स’ गेल्या अनेक वर्षांत वर्षा ऋतूचं भाकीत करू लागली. वसंतराव गोवारीकरांसारख्या शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात मोठंच कार्य केलं.

त्यावर आधारित पर्जन्यवृष्टीचा अनुभव मधलं एक दशकभर चांगला आला, पण नंतर केवळ चर्चेपुरत्या असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणाचे प्रत्यक्ष ‘प्रताप’ दिसू लागले. कधी अपेक्षित नसेल तिथे ढगफुटी होऊन पाणी बदाबदा कोसळू लागलं. पिकं हाताशी यायची वेळ झाल्यावर उभी पिकं आडवी करू लागलं. सोसाटय़ाचा झंझावात आंब्यापासून, द्राक्ष, संत्र्यांच्या बागा उद्ध्वस्त करू लागला. अवकाळी पाऊस नि गारपिटीने कापूस चिंब झाला आणि तरारलेल्या तारांचा फक्त पेंढा हाती राहून शेतकऱ्याच्या डोळय़ांत फक्त पाणी उरलं.

सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे यंदा पाऊस ‘चांगला’ झाला असला, गव्हा-तांदळाचं उत्पादन विक्रमी येण्याची चिन्हं असली तर ‘नवान्न पौर्णिमे’ला शेतकरी सुखावून जाईल, पण चक्रीवादळाने ज्यांचं नुकसान झालंय आणि शेतंच ‘वाहून’ गेलीयत, त्यांच्या पुढचे प्रश्न मोठे आहे. गेल्या दोन वर्षांच्या कोविड काळात सारं जग हवालदिल झालेलं असताना शेतकरी मात्र मातीत पाय रोवून आपलं काम अव्याहतपणे करत राहिला. त्याच्या संसारात सुख फुलावं हीच इच्छा. आणखी एक…सरत्या पावसाबरोबरच कोविडनेही कायमचा निरोप घ्यावा. पावसाने मात्र पुढच्या वर्षी ‘नेमेचि’ यावं. त्याचं आपल्याला हवं तसं नि तेवढंच वास्तव्य सांभाळायचं असेल तर निसर्ग जतनाची शिस्तही पाळावी लागेल. नुसता देवावर भरवसा ठेवून भागत नाही. ‘उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम हे सहा गुण असतात, तिथेच देव सहाय्य करतो’ असं एक संस्कृत सुभाषित सांगतं. खरं तर या सद्गुणांमधेच ‘देवत्व’ सामावलेलं आहे. तेव्हा सध्या तरी ‘उघड पावसा, ऊन पडू दे, उडू, बागडू, हसू, खेळू दे’ अशी बालसुलभ निरागस इच्छा व्यक्त करूया.

[email protected]