
हिंदुस्थानचा आघाडीचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीने ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या विक्रमाची बरोबरी केली. 37 वर्षीय छेत्रीने मालदीवमध्ये सुरू असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिपमध्ये नेपाळविरुद्ध एक गोल करून कारकीर्दीतील 77 वा आंतरराष्ट्रीय गोल करून पेलेंची बरोबरी केली. पेलेंनी 92 लढतींत 77 गोल केले होते.
सुनील छेत्रीने केलेल्या गोलच्या जोरावर हिंदुस्थानने नेपाळचा 1-0 असा पराभव केला. स्पर्धेतील हिंदुस्थानचा हा पहिलाच विजय. बांगलादेश व श्रीलंका या संघांनी हिंदुस्थानला बरोबरीत रोखण्यात यश मिळविले होते.
फक्त रोनाल्डो अन् मेस्सी पुढे
सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सुनील छेत्री 77 आंतरराष्ट्रीय गोलसह यूएईच्या अली मबखौतसह संयुक्तपणे तिसऱया स्थानावर आहे. त्याच्यापुढे केवळ पोर्तुगालचा खिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी हे दोनच फुटबॉलपटू आहेत. रोनाल्डो 112 गोलसह अव्वल, तर मेस्सी 79 गोलसह दुसऱया स्थानावर आहे.
गुणतालिकेत तिसऱया स्थानी
सात वेळा सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपचा किताब जिंकणारा हिंदुस्थानी संघ आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱया स्थानी आहे. हिंदुस्थानने तीन सामन्यांत 5 गुणांची कमाई केली आहे. यजमान मालदीव, नेपाळ प्रत्येकी 6 गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱया स्थानावर आहेत. हिंदुस्थानला स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी बुधवारी मालदीवविरुद्ध होणाऱया साखळी लढतीत विजयच मिळवावा लागणार आहे.
























































