
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत तसेच आयबी व केंब्रिज बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. त्या माध्यमातून मुंबई महापालिका दर्जेदार शिक्षण देत असून पुढेही दर्जेदार शिक्षणासाठी महापालिका कटिबद्ध असणार आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
मुंबई महापालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्या प्रयत्नाने परळगावमधील परमानंदवाडी येथे तळमजला अधिक तीन माळ्यांच्या नवीन इमारतीमध्ये नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, महापालिकेनेच्या सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देण्यात येणार आहे. त्यासोबत प्रत्येक विभागामध्ये एक स्वतंत्र सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच 24 वस्तूंचे विनामूल्य वाटप असो किंवा खेळांमध्ये फिफासोबत केलेला करार असो, या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जगभरात त्यांना कोणत्याही ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला बचत गटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी सेंट्रल किचन तयार करण्यासाठी महापौरांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थापत्य समिती अध्यक्ष (शहर) दत्ता पोंगडे, नगरसेवक सचिन पडवळ, अनिल कोकीळ, नगरसेविका सिंधू मसुरकर, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, राहुल कनाल, झकारिया, शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी कापसे उपस्थित होत्या.


























































