नगर शहरासह उपनगरेही अडकली वाहतूक कोंडीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरासह उपनगरांमध्येही वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, वाहनचालक नागरिकांना तासन्तास या कोंडीत अडकून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे पोलिसांची वाहनेही या कोंडीत सापडत असून, वाहतुकीच्या नियोजनाचे तीन-तेरा वाजले आहेत. वाहतुकीचा बोजवारा उडाला असताना शहर वाहतूक शाखेचे त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे.

दिवाळीचा सण तोंडावर आला असल्याने शहरातील गर्दी वाढत आहे. या गर्दीत बेशिस्त वाहनचालक आणि बेशिस्त पार्ंकगमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. शहरातून जाणारे महामार्ग वगळता शहरांतर्गत आणि बाजारपेठांच्या परिसरात वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी नजरेस पडत नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याच्या बाजूनेच वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात. पार्ंकगची व्यवस्था नाही अशा ठिकाणी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे रहदारीला अडथळे येऊन वाहतूक कोंडी होत आहे.

शहरातील तेलीखुंट परिसरात मंगळवारी मोठी वाहतूककोंडी झाली. या कोंडीत तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाचे वाहनही अडकले. पोलीस अधिकाऱयांसह नागरिकही या वाहतूक कोंडीत अडकून घामाघूम झाले. आधीच रस्त्यांवरील खड्डय़ांनी नागरिक हैराण झालेले असताना आता वाहतूक कोंडीच्या समस्येची त्यात भर पडली आहे.

सणासुदीचा काळ, वाढणारी गर्दी, शहरात सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम, या बाबी विचारात घेऊन शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तथापि या गंभीर समस्येबाबत वाहतूक शाखेच्या अधिकाऱयांनाच कोणतेही गांभीर्य राहिलेले नाही. त्यामुळे शहरात बेशिस्त वाहतूक बोकाळली असून, या बेशिस्तपणाला आवर घालायला प्रशासनाचे अधिकारी धजावत नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. किमान पुढील महिनाभर तरी वाहतुकीचे योग्य नियोजन शहर वाहतूक शाखेने करून नागरिकांची, वाहनधारकांची या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी होत आहे.