
महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या वीज कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस द्यावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अभियंते व अधिकारी संघर्ष समितीने वीज कंपन्यांना बारा दिवसांपूर्वी निवेदन दिले आहे. मात्र दिवाळी चार दिवसांवर अलेली असतानाही प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वीज कामगार तीव्र नाराजी व्यक्त करत असून व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
वीज कामगारांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस देण्याबाबत संघर्ष समितीच्या वतीने व्यवस्थापनाकडे मागणी केलेली आहे. मात्र प्रशासनाकडून कुठलीही हालचाल सुरू नसल्यामुळे कामगार,अभियंते व अधिकारी यांच्यामध्ये प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तसेच तिन्ही कंपन्यांनी संघर्ष समितीच्या पत्राची दखल न घेतल्याने प्रशासनाचा निषेध केला आहे. वीज कामगारांनी कोरोना महामारी, अतिवृष्टी, महापुरात चांगली कामगीरी केलेली आहे. वीज बिलाची वसुलीही चांगली आहे. त्यामुळे संघर्ष समितीमध्ये असलेल्या 25 संघटना पदाधिकाऱ्यांची आज ऑनलाइन बैठक झाली. त्यामध्ये प्रशासनाने दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान व बोनस जाहीर करावा अन्यथा आंदोलन केले जाईल, असे संघर्ष समितीच्या वतीने कृष्णा भोयर यांनी सांगितले.






















































