
कोरोनामुळे मार्च 2020 पासून तब्बल दीड वर्ष बंद असलेले पालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे दरवाजे सोमवार, 1 नोव्हेंबरपासून उघडणार आहेत. पर्यटकांसाठी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तर सकाळी 6 ते 8.30 पर्यंत मार्निंग वॉकसाठी उद्यान खुले राहणार आहे. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक राहणार असून ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि 5 वर्षांखालील लहान मुलांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे किंवा विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. यानंतर काही दिवसांतच वेगाने रुग्णवाढ सुरू झाल्याने 23 मार्च 2020 पासून देशभरातच लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर 15 फेब्रुवारी 2021 पासून उद्यान पुन्हा पर्यटकांसाठी कोरोना खबरदारी घेऊन सुरू करण्यात आले. मात्र कोरोनाची दुसरी मोठी लाट आल्याने 4 एप्रिलपासून पुन्हा उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. मात्र आता कोरोनाची दुसरी लाटही पूर्ण आटोक्यात आली असून अनेक निर्बंधही शिथिल करण्यात आल्याने उद्यान व प्राणी संग्रहालय 1 नोव्हेंबरपासून पुन्हा खुले करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्यान प्रशासनाकडून कोरोना खबरदारीसाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, उद्यान व प्राणिसंग्रहालयाला दररोज सुमारे दीड लाखाचे, महिन्याला 45 लाखांचे तर वर्षाला 8 ते 10 कोटी उत्पन्न मिळते. मात्र गेल्या दीड वर्षापासून उद्यान बंद असल्याने दररोज दीड लाखाचे नुकसान होत आहे. त्यामुळे उद्यान सुरू झाल्यावर पालिकेला पुन्हा मोठा महसूल मिळणार आहे.
दररोज दहा हजार पर्यटकांचे नियोजन
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात गेल्या काही वर्षात पेंग्विनसह अनेक प्राणी-पक्षी आणल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. यामध्ये दररोज पाच ते सहा हजार पर्यटक येतात. तर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या बारा ते पंधरा हजारांपर्यंत जाते. गेल्या काही वर्षांत झालेल्या सुधारणांमुळे ही संख्या वाढतच आहे. मात्र सध्या कोरोना खबरदारी घेणे अनिवार्य असल्याने दररोज दहा हजार पर्यटकांचे नियोजन करण्यात येईल. गर्दी झाल्यास गेट बंद करण्यात येईल अशी माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
अशी नियमावली राहणार
- उद्यानात मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही
- सुरक्षित अंतर पाळावे, गर्दी करू नये
- प्राणिसंग्रहालयात येताना सोबत कमीत-कमी साहित्य आणावे
- साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद
- प्रवेशद्वाराजवळील सॅनिटायझरचा वापर करावा
- प्रदर्शनीय क्षेत्रात प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू नये.
- प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेड्स स्पर्श करू नये.
- प्राणिसंग्रहालयात केरकचरा इतरत्र टापू नये व थुंपू नये.
- कचराकुंडीचा वापर करावा
- कोणतेही खाद्यपदार्थ प्राणिसंग्रहालयात आणू नये.
























































