
नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत असून हे प्रकरण नागरिकांना छळण्यासाठी… बदनाम करण्यासाठी व नागरिकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दापोली येथे पत्रकार परिषदेत केला. शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत घडलंय आणखी इतरांच्या बाबतीतही झालं असेल त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची दक्षता समितीने चौकशी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दापोली येथे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. वानखेडे याने घेतलेला दाखला व आयआरएस मध्ये जो प्रवेश घेतला तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याचं गणित लवकरच उकळेल आणि फसवणूक कुणी केली व कशी केली याचा खुलासादेखील लवकरच होईल. चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम खऱया गोष्टींची चौकशी करेल. त्यामुळे ही टिम चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आली नसावी असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.



























































