
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केंद्र सरकार आणि एनसीबीवर जोरदार शब्दात हल्ला चढवला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पळून जाण्यास कोणी मदत केली याचे उत्तर भाजपने द्यावे अशी मागणी त्यांनी केली. एनसीबीतल्या वसुली गँगचा पर्दाफाश होत असून समीर वानखेडे यांची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल असेही ते म्हणाले.
ईडीची कारवाई राजकीय सुडातून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरवण्यासाठी करण्यात आली, असे नवाब मलिक म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप लावले ती व्यक्ती फरार आहे आणि आरोप असलेली व्यक्ती स्वतःहून चौकशीला सामोरे गेली त्यांना अटक झाली. एक दिवस सत्य बाहेर येईल. मात्र परमबीर सिंह कुठे आहेत याचे उत्तर केंद्राने द्यावे. लुकआऊट नोटीस असताना कोणतीही व्यक्ती देश सोडून कशी बाहेर जाऊ शकते? उत्तराखंड, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांतून नेपाळला जाता येते. या तीनही राज्यांत भाजपचे सरकार आहे. इतर लोकांप्रमाणे परमबीर सिंह यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली आहे, का अशी विचारणा त्यांनी केली.
ड्रग्जच्या व्यवसायात भाजपचे नेते
अमली पदार्थांच्या व्यवसायात भाजपचे नेते व भाजपशी संबंधित लोकांचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. मनीष भानुशाली, के. पी. गोसावी, रवींद्र कदम आणि एनसीबीचे समीर वानखेडे यांचे रॅकेट काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. या सर्वांना अटक करावी आणि आर्थिक गुन्हे शाखा, व क्राइम ब्रँचमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत, अशी मागणीही अतुल लोंढे यांनी केली.
जेएनपीटीत अफूचे कंटेनर
जेएनपीटी बंदरावर तीन कंटेनर भरून 51 टन अफूचे बीज पंधरा दिवसांपासून पडून आहे. या तीन कंटेनरवर एनडीपीसी कायद्याअंतर्गत कारवाई का होत नाही, अशी विचारणा त्यांनी केली.
वानखेडेंचे शर्ट 50 हजारांचे
समीर वानखेडे यांचे 50 ते 70 हजार रुपयांचे शर्ट असते. दोन लाख रुपयांचा पट्टा, एक लाख रुपये किंमतीची पँट, अडीच लाख रुपयांचे बूट, घडय़ाळ 20 ते 50 लाख रुपयांचे असते. वानखेडे यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी दहा कोटींचे कपडे घालू शकतो का, असा प्रश्न केला. वानखेडे यांनी महागडे कपडे घालण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे टाकल्याचा टोला नवाब मलिक यांनी मारला.































































