मुद्रा योजनेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान मुद्रा योजनेच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील ठगाला बीकेसी सायबर पोलिसांनी अटक केली. संजीव रामनगिना यादव असे त्याचे नाव आहे. त्याने 25 हजार रुपयांच्या मोबदल्यात अनेक बनावट कागदपत्रे तयार करून बँक खाती उघडल्याचा पोलिसांना संशय आहे. तक्रारदार हे व्यावसायिक असून ते वांद्रे परिसरात राहतात. त्यांनी काही कारणामुळे जीएसटी भरला नव्हता.

जीएसटी भरण्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेनबाबात ऑनलाइन सर्च केले. ऑनलाइन सर्च केल्यावर त्यांनी एक वेबसाईट उघडली. त्यानंतर तक्रारदार याना फोन आला. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज हवे असल्यास कागदपत्रे सादर करण्यास सांगून प्रोसेस फीच्या नावाखाली पैसे विविध बँक खात्यांत जमा करण्यास सांगितले. लोनची गरज असल्याने तक्रारदार यांनी सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात विविध खात्यांत पैसे भरले. विश्वास बसावा म्हणून तक्रारदार यांना बँकेकडून लोन पास झाल्याचा ई-मेल पाठवण्यात आला होता. प्रोसेस फी भरल्यानंतर तक्रारदार यानी लोनच्या रकमेबाबत बँकेकडे चौकशी केली. तेव्हा बँकेकडून कोणत्याही प्रकारचे लोन मंजूर झाले नसल्याचे तक्रारदार यांना सांगितले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच तक्रारदार यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.