
एकरकमी एफआरपी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाला सांगली जिल्ह्यात हिंसक वळण लागले आहे. ऊसवाहतूक करणारे राजारामबापू, क्रांती या कारखान्यांचे ट्रॅक्टर पेटविण्यात आले, तर विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टर पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी केली आहे. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र सांगली जिल्ह्यात दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी एक रकमी एफआरपी जाहीर केली आहे. तर अन्य दोन कारखाने जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. मात्र राजारामबापू, क्रांती आणि विश्वास कारखान्याकडून काहीच भूमिका घेतली जात नसल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत. राजारामबापू कारखान्याच्या 35 वाहनांची हवा सोडण्यात आली. यापूर्वी तासगाव तालुक्यात कुमठेफाटा, कडेगाव तालुक्यात रामपूरफाटा याठिकाणी वाहनाची हवा सोडून वाहतूक बंद पाडली होती. याच प्रश्नावर जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दोन वेळा सर्व कारखान्यांवर दुचाकी रॅली काढण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे राजारामबापू कारखान्याचा ट्रॅक्टर पेटविण्यात आला. तर क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर कडेगाव तालुक्यात बळवडी फाटा येथे पेटविण्यात आला. यासह विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदुळवाडी येथेच पेटविण्याचा प्रयत्न झाला.


























































