मधुमेह टाळणे तुमच्या हातात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अविनाश भोंडवे

कोरोनासारख्या आजारांची महामारी काही वर्षांत कमी होते, लसींमुळे आजार उद्भवणे टाळता येते, औषधांनी हे आजार नष्टही होऊ शकतात; पण मधुमेहासारख्या असांसर्गिक आजाराची वैश्विक साथ वर्षानुवर्षे सुरूच राहते. उलट उत्तरोत्तर त्याची व्याप्ती प्रमाणाबाहेर वाढतच चाललेली दिसून येते. असांसर्गिक आजारांना ना लस असते ना तो नष्ट करणारे औषध. मधुमेहासारखे आजार जीवनशैलीतील चुकांमुळे होतात.

दरवर्षी 14 नोव्हेंबरला ‘जागतिक मधुमेह दिन’ साजरा होतो. जागतिक आरोग्य संघटना जगातील नागरिकांचे मधुमेहाबाबत प्रबोधन करण्यासाठी 1991 सालापासून गेली 30 वर्षे हा उपक्रम राबवते आहे. मधुमेह म्हणजे शरीरातील अंतर्गत बदलांमुळे होणारा आजार. तो कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या संसर्गाशिवाय होऊ शकतो. त्यामुळे याला असांसर्गिक आजार म्हटले जाते.

कोरोना, प्लेग, मलेरिया. स्वाईन फ्लू, इन्फ्लुएन्झा अशा संसर्गजन्य आजारांच्या अनेक साथी आणि महामारी संपूर्ण जगाने गेल्या दोन-तीन शतकांत अनुभवल्या, पण मधुमेहासारख्या संसर्गजन्य नसलेल्या, असांसर्गिक आजाराची महामारी विश्वभरात गेली दोन-अडीच दशके सुरूच आहे. सांसर्गिक आजाराने जसे अगणित मृत्यू होतात तसेच मधुमेहानेही झाले आहेत.

मधुमेहाची महामारी

जगभरात मधुमेहाने पीडित असलेल्या लोकांची संख्या 1980मध्ये 11 कोटीच्या घरात होती. ती 2014 मध्ये 43 कोटी झाली आणि 2035पर्यंत ती 60 कोटी बाधितांच्या पुढे जाईल. जगभरात 18 वर्षांवरील व्यक्तींमध्ये 8 ते 9 टक्के लोकांना मधुमेह आहे. 2014मध्ये जगभरात मरण पावलेल्या व्यक्तींमध्ये 48 टक्के लोकांच्या मृत्यूचे कारण मधुमेहामुळे होणारी गुंतागुत हेच होते.

मधुमेह म्हणजे जगातील श्रीमंत माणसांचा आजार असा अनेकांचा समज आहे, पण जागतिक आकडेवारीनुसार उच्च उत्पन्न असलेल्या प्रगत देशांपेक्षा अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या गरीब व विकसनशील देशांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. दिवसेंदिवस ही संख्या आणखी झपाटय़ाने वाढत आहे. मधुमेहामुळे अनेक दुर्धर आजार निर्माण होतात. यामध्ये कायमचे अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे, अर्धांगवायू होणे आणि गँगरिन होऊन पाय तोडावे लागणे अशा प्रकारच्या रुग्णाला कायमचे विकलांग करणाऱ्या गंभीर आजारांचा समावेश मोठय़ा प्रमाणात आहे. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वी म्हणजे 2019मध्ये जगभरात होणाऱ्या मृत्यूच्या कारणांची मृत्युसंख्येनुसार क्रमवारी पाहिली तर मधुमेहाचा क्रमांक नववा होता. त्यावर्षी दीड कोटी व्यक्ती मधुमेहाने मृत्यू पावल्या होत्या.

आपला देश हा कोरोनाची राजधानी समजली जाते. जगात सर्वाधिक मधुमेही रुग्ण असलेल्या पहिल्या दोन देशांपैकी असलेल्या हिंदुस्थानात एकूण साडेसहा कोटी मधुमेही रुग्ण आहेत आणि 2030 पर्यंत दरवर्षी 40 लक्ष लोक मधुमेहामुळे मृत्यू पावतील असा हिंदुस्थान वैद्यकीय संस्थांचा अंदाज आहे.

मधुमेह कसा होतो?

आपल्या शरीरात पोटामध्ये असलेल्या स्वादुपिंड नावाच्या ग्रंथीमधून इन्सुलिन नावाचा एक हार्मोन स्रवतो. हा हार्मोन शरीरात गरजेपेक्षा जास्त असलेल्या साखरेचे रूपांतर ग्लायकोजेन नावाच्या पदार्थात करून यकृतामध्ये त्याचा साठा करण्याची तजवीज करतो आणि शरीराला नंतरच्या काळात साखरेची उणीव भासली, तर या यकृतात असलेल्या ग्लुपॅगॉन या हार्मोनद्वारे या ग्लायकोजेनचे रूपांतर पुन्हा ग्लुकोज साखरेत होते. शरीरातील साखर कमी करण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने त्यांच्या रक्तातील साखर अमर्याद वाढत राहते. याला टाईप-1 मधुमेह म्हणतात. या व्यक्तींना मधुमेह नियंत्रणासाठी इंजेक्शन स्वरूपात कायमस्वरूपी इन्सुलिन टोचून घ्यावे लागते.

आहारात जास्त प्रमाणात साखर आणि साखरेची भरमार असलेले गोड पदार्थ सातत्याने आल्यास या साखरेचे प्रमाण कमी करणारा इन्सुलिन हार्मोन निर्माण करणाऱ्या स्वादुपिंडाच्या पेशी या सातत्याने वाढणाऱ्या कार्याने थकून अशक्त होऊ लागतात. साहजिकच त्यांच्यापासून निर्माण होणारे इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होऊ लागते. परिणामतः रक्तात मर्यादेपेक्षा वाढलेली साखर आवश्यक प्रमाणात कमी होत नाही आणि रक्तातील साखर वाढलेलीच राहते. याला टाईप-2 मधुमेह म्हणतात.

टाईप-2 मधुमेह होण्याचे आणखी एक कारण असते. काही व्यक्तींच्या आहारात गोड पदार्थांचा तसेच तेल, तूप अशा स्निग्ध पदार्थांचा समावेश खूप जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त उष्मांक आहारातून मिळत असतात. त्याचबरोबर हे उष्मांक जाळून कमी करण्यासाठी आवश्यक असलेली शरीराची हालचाल आणि उष्मांक जाळणारे एरोबिक व्यायाम त्यांच्या बैठय़ा जीवनशैलीमुळे होत नाहीत. परिणामतः त्यांच्यात अनावश्यक वजनवाढ होते. ही वजनवाढ शरीरामध्ये त्वचेखाली असलेल्या चरबीच्या स्वरूपात जमा होते. या व्यक्तींच्या या अतिरिक्त चरबीमुळे स्वादुपिंडामधून स्रवणाऱ्या इन्सुलिनचा परिणाम कमी होतो. याला इन्सुलिन अवरोध (इन्सुलिन रेझिस्टन्स) म्हणतात. त्यामुळे स्वादुपिंडातून अधिकाधिक प्रमाणात इन्सुलिन स्रवू लागते. शेवटी याही कारणाने स्वादुपिंडाच्या पेशी थकून जातात आणि इन्सुलिन स्रवणे कमी होत होत पूर्ण थांबते आणि व्यक्तीला टाईप-2 मधुमेह होतो.

प्रतिबंधक उपाय

मधुमेह होण्याची कारणे लक्षात घेतल्यास तो टाळण्याचे उपाय साहजिकच स्पष्ट होतात.

आहार- समतोल आहार, शर्करायुक्त पदार्थांचा मर्यादित समावेश आणि मेदयुक्त पदार्थ आहारात कमी ठेवणे गरजेचे असते. आजच्या जीवनशैलीत फास्ट फूड, कोला पेये, डबाबंद आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा आहारात वापर केल्याने गरजेपेक्षा जास्त साखर आणि स्निग्ध पदार्थ घेतले जातात. जिभेवर नियंत्रण ठेवून आपल्या दैनंदिन गरजांएवढाच आहार प्रत्येकाने घेणे हा सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय ठरतो.

व्यायाम- मधुमेह टाळण्यासाठी व्यायाम अतिशय महत्त्वाचा असतो. गरजेपेक्षा जास्त खाल्लेल्या पदार्थांचे उष्मांक कमी करण्यासाठी, शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी आणि वजनवाढ रोखण्यासाठी नियमित व्यायामाची नितांत गरज असते. मात्र हा व्यायाम भरभर चालणे, धावणे, जॉगिंग, सायकलिंग, दोरीवरच्या उडय़ा, पोहणे अशा प्रकारचा म्हणजे एरोबिक पद्धतीचा असावा लागतो. आहारात फायबरचे प्रमाण वाढवा. पालेभाज्या खा. फळांमध्ये फ्रक्टोज साखर असल्याने ती मर्यादित स्वरूपात खा.
मधुमेह होण्याचे कारण कोणतेही असो, पण मधुमेहावर प्रभावी उपचार केले जाऊ शकतात. मधुमेह नियंत्रणात राखल्यास त्यापासून निर्माण होणारे आजार टाळता येतात. मधुमेह आणि त्याचे विपरीत परिणाम योग्य आहार, शारीरिक क्रियाकलाप, विश्रांती अशा जीवनशैलीतील बदलांनी टाळता येतात. नियमितपणे योग्य औषधोपचार केल्यास, नियमित वैद्यकीय तपासण्या करत राहिल्यास विकलांग करून टाकणाऱ्या या आजाराला पूर्णपणे ताब्यात ठेवून उत्तम प्रतीचे जीवन जगता येते हाच जागतिक मधुमेह दिनाचा संदेश आहे.

कोरोना आणि मधुमेह

कोरोनाच्या संसर्गात मधुमेह ही महत्त्वाची सहव्याधी (कोमॉर्बिड कंडिशन) मानली गेली आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांत मधुमेही व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग सहजी होतो, त्यांचा आजार गंभीर स्वरूप धारण करतो हे लक्षात आलेले आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णात मधुमेही व्यक्तींचे प्रमाण सर्वात जास्त आहे. कोरोनापश्चात आजारांमध्ये काळ्या बुरशीचा (म्युकर मायकोसिस) संसर्ग जडण्यास मधुमेह हे प्रमुख कारण मानले गेले आहे. मधुमेही व्यक्तींना काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्यास मृत्यूचे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत वाढते. कोरोनामध्ये मधुमेही व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी कमालीची वाढते आणि कोरोना बरा झाला तरी रक्तातील साखर गंभीर पातळीवर राहते.

कोरोना बरा झाला तरी त्याची लक्षणे दीर्घकाळ अस्तित्वात राहणारा एक प्रकार – ‘लॉंग कोविड सिंड्रोम’ सध्या मोठय़ा प्रमाणात आढळून येतो आहे. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह अनियंत्रित राहण्याची लक्षणे अधिकाधिक दिसत आहेत. परिणामतः कोरोनापश्चात मूत्रपिंडे निकामी होणे, अंधत्व येणे, पायांचे गँगरिन होणे अशा आजारांचे रुग्ण अधिक संख्येने आढळून येऊ लागतील. मधुमेही व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतल्यास कोरोना होण्याची शक्यता 70 टक्क्यांनी कमी होते. तो झाला तरी गंभीर स्वरूपाचा होत नाही आणि कोरोनात मृत्यू होण्याची संभाव्यता 95 टक्क्यांनी कमी होते.

(लेखक आयएमएचे अध्यक्ष आहेत.)
n [email protected]