
क्रिकेटविश्वातील सर्वात श्रीमंत संघटना असलेल्या हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कर विभागाविरुद्ध मोठा विजय मिळाला आहे. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील कमाईवर कर जमा करावा लागणार नाही, असा निकाल आयकर अपिलीय न्यायाधिकरणाने (आयटीएटी) दिल्याने बीसीसीआयला मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत स्पष्टीकरण देताना आयटीएटीने म्हटले की, बीसीसीआय दरवर्षी आयपीएलमधून कोटय़वधी रुपयांची कमाई करते यात शंका नाही. मात्र जगभरातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आहे, हे नाकारता येणार नाही. क्रिकेटच्या विकासासाठी आयपीएल असल्यामुळे त्यातून मिळणाऱया उत्पन्नावर कर आकारता येत नाही.
क्रिकेटला प्रोत्साहन देणारी स्पर्धा
हा निकाल देताना अपिलेट ट्रिब्युनलने सांगितले की, बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेची रंगतदार रचना करून या स्पर्धेची लोकप्रियता वाढविली आहे. लोकप्रियतेमुळे आयपीएल स्पर्धेसाठी प्रायोजकत्वाचा पूर येतो व बीसीसीआयला कोटय़वधी रुपयांची कमाई होते. ही स्पर्धा क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे या स्पर्धेतून करवसुली करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल आयटीएटीने दिला आहे.


























































