कर्मचाऱयांचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठ दिवसांपासून एसटी कर्मचाऱयांच्या संपाचा सुरू असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही. एसटी डेपोपासून आझाद मैदानापर्यंत कर्मचाऱयांचे आंदोलन सुरू असतानाच आज एसटी कर्मचाऱयांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मंत्रालयासमोरील रस्त्यावर दोन पुरुषांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन त्यांना रोखल्याने अनर्थ टळला.

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एसटी कर्मचारी संपातील आंदोलक मंत्रालयासमोर पोहोचले. त्यातील दोन पुरुषांनी स्वतःवर रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्या दोन पुरुषांना ताब्यात घेतले. त्याच वेळी चार महिलांनी मंत्रालयासमोरील रस्त्यावर ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या महिलांना पोलिसांनी तिथून उठण्याची विनंती केली. मात्र त्यांनी हुज्जत घातल्याने त्या दोन पुरुष व चार महिलांना ताब्यात घेऊन मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे सोपविण्यात आले. या महिलांनी आपण अनिल परब यांच्या बंगल्याबाहेर एसटी कर्मचाऱयांच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत असल्याचे सांगितले.

पालघरमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

पालघर येथील एसटी चालक दीपक खोरगडे (30) याने घरातच विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तेथीलच उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.