प्रसिद्ध लेखिका मन्नू भंडारी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘महाभोज’, ‘आपकी बंटी’ या अजरामर कादंबऱ्या लिहिणाऱ्या हिंदीतील प्रसिद्ध लेखिका मन्नू भंडारी यांचे आज सोमवारी निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. भंडारी यांच्यावर गेल्या आठवडाभरापासून गुरगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांची मुलगी रचना यादव यांनी दिली. त्यांच्या निधनाने हिंदी साहित्य क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मन्नू भंडारी यांचा जन्म 3 एप्रिल 1939 रोजी मध्य प्रदेशातील मंदसौर जिह्यातील भानपुरा गावात झाला. प्रसिद्ध लेखक राजेंद्र यादव हे त्यांचे पती होत. मन्नू भंडारी याची पहिली कादंबरी ‘एक इंच मुस्कान’ 1961 मध्ये प्रकाशित झाली होती. ही कादंबरी त्यांनी राजेंद्र यादव यांच्यासह लिहिली होती. ती खूप लोकप्रिय होती. ‘मैं हार गई’, ‘तीन निगाहों की एक तस्वीर’, ‘एक प्लेट सैलाब’, ‘यही सच है’, ‘आंखों देखा झूठ’ और ‘त्रिशंकु’ हे त्यांचे लोकप्रिय संग्रह आहेत. त्या स्त्रियांचे व्यक्तिचित्र, त्यांचा संघर्ष, समाजातील स्त्रियांचे स्थान, त्यांचे आंतरिक द्वंद्व, घुसमट या विषयावर त्यांचा हातखंडा होता. 1974 सालचा ‘रजनीगंधा’ हा चित्रपट त्यांच्या ‘यही सच है’ या कथेवर आधारित होता. बासू चॅटर्जी यांनी हा चित्रपट बनवला. भंडारी हिंदी साहित्यातील नवकथा चळवळीचा त्या भाग होत्या. या चळवळीची सुरुवात निर्मला वर्मा, राजेंद्र यादव, भीष्म साहनी, कमलेश्वर यासारख्या लेखकांनी केली होती.