
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज स्पष्ट शब्दांत नकार दिला. इंद्राणी ही या प्रकरणात मुख्य आरोपी असून तिने स्वतःच्या मुलीच्या हत्येचा कट रचला होता हा सीबीआयचा दावा ग्राह्य धरत न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी इंद्राणीचा जामीन अर्ज आज फेटाळला.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणीला ऑगस्ट 2015 साली अटक झाली असून ती भायखळा कारागृहात शिक्षा भोगत आहे. खटल्याच्या गुणवतेच्या आधारावर आपली सुटका करावी, अशी मागणी करत इंद्राणीने मुंबई उच्च न्यायालयात अॅड. सना खान यांच्यामार्फत जामीन अर्ज केला होता. या याचिकेवर आज न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी घेतली. त्या वेळी अॅड. सना खान यांनी न्यायालयात सांगितले की, इंद्राणी गेल्या सहा वर्षांपासून तुरुंगात आहे. या प्रकरणातील आरोपी पिटर मुखर्जी याला जामीन मिळाला असून इंद्राणीलाही जामीन देण्यात यावा. मात्र न्यायमूर्तींनी तिची मागणी करण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळला.

























































