जालन्यात सहा हातभट्ट्यांवर धाडी, तब्बल सात लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सुरु केली असून बुधवारी जालना शहरातील कैकाडी मोहल्ला व नुतन वसाहत भागातील सहा हातभट्टी दारुच्या अड्ड्यांवर छापे टाकले. त्यात सात लाखांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जालना शहरातील कैकाडी मोहल्ला भागात व नुतन वसाहत भागात काहीजण गावठी हातभट्टीची दारु तयार करुन चोरटी विक्री करीत आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यावरुन पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी पहाटे एकाच वेळी कैकाडी मोहल्ला भागात पाच ठिकाणी व नुतन वसाहत जालना येथे एका ठिकाणी अशा एकूण सहा ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी हातभट्टी दारुच्या भट्या लावून गावठी हातभट्टी तयार करताना काही महिला आढळल्या. या ठिकाणी पाहणी केली असता सिमेंटच्या हौदामध्ये लोखंडी व प्लॅस्टीकच्या ड्रममध्ये गुळ मिश्रीत उग्र वास येत असलेले रसायन, गावठी दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ व तयार हातभट्टीची दारु असा एकूण 6 लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलांविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.