
शिराळा तालुक्यातील वारणावती चांदोली येथे असणारी भूकंपमापन यंत्रणा कालबाह्य झाल्याने येथील भूकंपाच्या नोंदी रामभरोसे झाल्या आहेत. कोकरूड येथील भूकंपमापन यंत्रणा बंद असल्याने भूकंपाचा केंद्र बिंदू कोणत्या दिशेला होता याचा अंदाज बांधणे यंत्रणेला अवघड जात आहे. शिराळा तालुक्यात वारणावती व कोकरूड येथे भूकंपमापन केंद्र आहे. भूकंप झाल्यास दोन्ही ठिकाणच्या नोंदीवरून त्याची तीव्रता व केंद्रबिंदू कळत होता. सध्या एकच भूकंपमापन यंत्र सुरू असल्याने या नोंदीला अडचण येत आहे.
वारणावती येथे भूकंपाच्या नोंदी घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारीच नाहीत. येथील एक प्रशिक्षित कर्मचारी चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी दुसरा प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आलेला नाही. भूकंप झाला की उपस्थित अन्य कर्मचारी, चौकीदार यांच्यामार्फत या नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे अचूक नोंदीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नोंदीत पडतोय फरक
गेल्या महिन्यात दुपारच्या सुमारास चांदोली परिसराला सौम्य स्वरूपाचा धक्का जाणवला होता. हा धक्का बराच वेळ असल्यामुळे परिसरात तो अधिक प्रमाणात जाणवला. त्यामुळे याची तीव्रता नक्कीच साडेतीन ते चार रिश्टर स्केलच्या दरम्यान असावी, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, त्याची नोंद वारणावती येथील भूकंपमापन केंद्रामध्ये 2.8 रिश्टर अशी अतिसौम्य नोंदवली गेली.
वारणावतीत चौकीदारावर केंद्राची जबाबदारी
नियमानुसार भूकंपमापन केंद्रात किमान चार ते पाच कर्मचारी आवश्यक आहेत. वारणावती येथे मात्र एका अप्रशिक्षित चौकीदारावर केंद्राची जबाबदारी टाकण्यात आली आहे. या कर्मचाऱयावर इतर कामाची जबाबदारी असल्यामुळे भूकंप झाल्यानंतरच हा कर्मचारी केंद्रात येतो. चांदोली परिसरात गेल्या 30 वर्षांत पंचवीस हजारांहून अधिक भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी शेकडो धक्के जाणवले आहेत. मध्यम स्वरूपाचे अनेक धक्के बसले आहेत. अशी परिस्थिती असतानाही येथील भूकंपमापन केंद्र व येथील यंत्रणा कालबाह्य आहे. शासनाने येथे अत्याधुनिक यंत्रणा प्रशिक्षित कर्मचारी देऊन केंद्र सुसज्ज करण्याची गरज आहे.
अपुरे कर्मचारी अन् कालबाह्य इमारत
चांदोली परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. चांदोली धरणाच्या बांधकामापासून वारंवार होणाऱया भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावती चांदोली परिसरातच आहे. या भूकंपाची नोंद घेता यावी म्हणून शासनाने तीस वर्षांपूर्वी वारणावती येथे भूकंपमापन केंद्राची उभारणी केली. मात्र, अपुरे कर्मचारी, मोडकळीस आलेली इमारत,कालबाह्य यंत्रणा यामुळे या केंद्राची दुरवस्था झाली आहे.
वारणा प्रकल्पांतर्गत वारणावती कोकरूड, मराठवाडी (ता. पाटण) चिखली (ता. संगमेश्वर) व साखरपा (ता. संगमेश्वर) या पाच ठिकाणी भूकंपमापन केंद्रे आहेत. भूकंप झाला की, या सर्व केंद्रांतील नोंदी विचारात घेऊन धक्क्याची तीव्रता निश्चित केली जाते. मात्र, या केंद्रांकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. यातील काही केंद्रे बंद आहेत.



























































