
>> डॉ. दीपक महिपत दळवी
काही माणसं जन्माला येतात तीच काही साहसी, वैशिष्टय़पूर्ण कामगिरी करण्यासाठीच. राष्ट्रहित जोपासत समाजाप्रति आपण काही देणे लागतो, ही प्रामाणिक भावना जोपासत एक सचोटीचा इतिहास उभा करणारे शिंदे – सोंडकर घराण्यातील कर्तृत्ववान पुरुष म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल, अशा शांताराम विश्राम शिंदे यांचा 15 नोव्हेंबर रोजी 79 वा जन्मदिवस अर्थात सहस्रचंद्र दिन साजरा झाला.
कोकणपुत्र शांताराम विश्राम शिंदे यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1942 रोजी रत्नागिरी जिह्यातील मंडणगड तालुक्यामधील कादवण या निसर्गाच्या कुशीत आणि डोंगरावर वसलेल्या छोटय़ाशा गावात झाला. गावात शिक्षणाचे धडे घेण्यास सुरुवात केली. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिक्षणाचे धडे गिरवायला भाग पाडले. मात्र घरात दारिदय़ पाचवीला पुजले असल्याने पुढे खेड तालुक्यातील दिवाण खावटी या मामाच्या गावी त्यांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले. आईवडिलांची होणारी परवड पाहून शैक्षणिक मर्यादेत त्यांचे मन रमेना. आपल्या आणि कुटुंबीयांच्या भविष्यासाठी दोन वर्षांनंतर त्यांनी मुंबई गाठली. डोळ्यांपुढे अनेक स्वप्ने आणि मनात ध्येयाची ऊर्मी असल्याने मिळेल ते काम करायचं ठरवलं. सुरुवातीलाच हॉटेलमध्ये काम मिळालं आणि शांताराम यांच्यावर ‘मुलगा कमावता झाला’ हा शिक्का बसला. साहजिकच कमावत्या आणि प्रामाणिक मुलाच्या कर्तव्याने वयाच्या 15 व्या वर्षापासूनच त्यांनी गावी आपल्या परिवारासाठी पैसे पाठवायला सुरुवात केली. लोअर परळ येथील शंकर विलास हॉटेल आणि माटुंगा येथील प्रभाकर रेस्टॉरंटमध्ये नोकरी करत असताना त्यांना दहा रुपये, 15 रुपये असा पगार होता. भावंडांमध्ये दुसरा क्रमांक असला तरी कर्तव्य कायम नंबर एकचे होते. त्यांच्या जीवनातील संघर्ष चालूच होता. एक दिवस ते थेट उभे राहिले ते मिलिटरी भरतीसाठी. त्यात त्यांची निवडही झाली.
मिलिटरीमधील निवड हा शांताराम शिंदे यांच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉइंट ठरला. 1960 साली मिलिटरीमध्ये निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी बंगळुरू येथे जावे लागले, मात्र मुलाचे हे प्रताप आईवडिलांना माहीत नव्हते. त्यांच्या मते त्यांचा मुलगा मुंबईत कुठेतरी नोकरी करतोय. त्यांचा कुठलाच संपर्क गावाशी झाला नाही. तब्बल वर्षभर आपला मुलगा नक्की कुठे आहे याचा थांगपत्ता आईवडिलांना नव्हता. कुणी काहीही बोलायचे आणि आई डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटायचा. दुसरीकडे त्यांचे खडतर प्रशिक्षण सुरू झाले होते. तब्बल वर्षभरानंतर त्यांना काही दिवस सुट्टी मिळाली आणि त्यांनी थेट गाव गाठले. जेव्हा ते गावी गेले तेव्हा खऱया अर्थाने कर्तृत्ववान मुलाची गावाला नव्हे, पंचक्रोशीला ओळख पटली.
1962 साली हिंदुस्थान आणि चीन युद्ध झाले. पुढे त्यांची सिक्कीमला पोस्टिंग झाली आणि हॉटेलच्या कामापासून सुरू झालेला प्रवास देशसेवेच्या वळणावर येऊन ठेपला. ते एएससीमध्ये (आर्मी सर्व्हिस कोर्स) होते. त्यानंतर 1964 साली त्यांची पोस्टिंग पंजाबला झाली. 1965 च्या पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळी ते फिरोजपूर येथे कर्तव्यावर होते. युद्धात सहभागी होऊन पाकिस्तानी सैनिकांना धूळ चारणाऱया हिंदुस्थानी सैनिकांमधील ते एक अविभाज्य भाग होते.
युद्ध संपल्यानंतर ते पुण्याला आले. केंद्र सरकारने मिलिटरीमध्ये सुधारणा करीत नव्याने बटालियन बनवल्या. त्यामुळे ते बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपमध्ये सामील झाले. त्यात पुन्हा इंजिनीअरिंग ट्रेनिंगला गेले. ती संपल्यानंतर ते राजस्थानला गेले. देसलमेल येथे कॅम्प होता. दोन वर्षांत रेगिस्तानमध्ये खडतर जीवन जगत देशसेवा करीत होते, त्यानंतर ते कश्मीरमधील पट्टी या ठिकाणी गेले. श्रीनगरपुढे बारामुल्लाजवळ हे पट्टी सेक्टर आहे. या अतिशय खडतर ठिकाणी आणि रोज कुठून गोळ्या येतील, याची शाश्वती नसलेल्या कश्मीरमध्ये चार वर्षे राहिले. पाकिस्तानला पहिल्या युद्धात पराभूत केल्यानंतर पुन्हा पाकिस्तानशी 1971चे युद्ध झाले. त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे करून हिंदुस्थानने बांगलादेश मुक्त केले आणि नवीन देशाची निर्मिती केली. या युद्धानंतर त्यांचे युनिट चंदिगढला आले. तीन महिन्यांनंतर कोलकाता येथे बदली झाली. ते 1977 पर्यंत टी. ए. आर्मी येथे चार वर्षे होते. 1977 मध्ये 15 वर्षे देशसेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले. मुंबईतील बँक ऑफ इंडियामध्ये महालक्ष्मी येथील शाखेत ते रुजू झाले. आर्मीत असताना इंग्रजी, हिंदी शिकले आणि मुलांना शिकविले. कोकणचे सुपुत्र, चार युद्धांचे साक्षीदार, लढवय्ये शांताराम विश्राम शिंदे यांनी समाजासमोर खूप मोठा आदर्श ठेवला आहे. आजही ते सामाजिक बांधीलकी जपून कुटुंब सांभाळतात. अशा या मनस्वी, थोर व्यक्तिमत्त्वाला सहस्रचंद्र दिनानिमित्त अनंत शुभेच्छा आणि शतशः प्रणाम!



























































