
न्यायालयातील प्रक्रियेला काळाचं बंधन असेलच असं नाही. त्यामुळे न्यायालयात चालणाऱ्या ट्रायल या लांबतात. पर्यायाने निकालही उशीरा लागतो.
एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या आरोपीला अवघ्या एक दिवसात जन्मठेप ठोठावण्यात आल्याची ऐतिहासिक घटना बिहार येथील आररिया येथे घडली आहे. ही घटना देशाच्या न्यायव्यवस्थेतील ऐतिहासिक घटना आहे.
हे प्रकरण 23 जुलै रोजी नोंदवण्यात आलं होतं. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी 18 सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी पोलिसांना आरोपीविरोधात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणात 10 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांची उलटतपासणी देखील करण्यात आली. सर्व साक्षीदारांची उलटतपासणी आणि युक्तिवाद एकाच दिवशी पार पडले. आणि या प्रकरणी शशिकांत रे यांनी सुनावणीवेळीच आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सोबत सुमारे 7 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई पीडितेला देण्याचे आदेश दिले.
इतक्या कमी वेळात यापूर्वी 2018मध्ये मध्य प्रदेशातील दातिया प्रकणात निकाल दिला गेला होता. पण, तो निकाल देण्यासाठी तीन दिवसांचा अवधी लागला होता. या प्रकरणात फक्त एका सुनावणीतच निकाल जाहीर करण्यात आला असल्याने हा निकाल ऐतिहासिक ठरला आहे.

























































