
कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे मार्केट रेडमध्ये गेले असले तरी गेल्या वर्षभरात अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. मल्टीबॅगर स्टॉकसह अनेक पेनी स्टॉक्सने देखील गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत. यातीलच एक म्हणजे 3i Infotech हा शेअर. या शेअरला अप्पर सर्कीट लागले असून गेल्या तीन महिन्यात हा शेअर 1200 टक्के वाढला आहे.
तीन महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत 8.48 रुपये एवढी होती. 27 ऑगस्ट 2021 ला एनएसईवर या शेअरची किंमत 9 रुपये देखील नव्हती. 26 नोव्हेंबरला शेअर बाजार 1600 हून अधिक अंकांनी कोसळला असला तरी हा शेअर मात्र ग्रिनमध्ये दिसत होता. सध्या या शेअरची किंमत 108.50 रुपये झाली आहे.
3i Infotech शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर शेअरप्रमाणे रिटर्न दिले आहेत. यात तुम्ही एक आठवड्यांपूर्वी एक लाख टाकले असते तर त्याचे 1.21 लाख रुपये झाले असते. तसेच गेल्या महिन्यात एक लाख गुंतवले असते तर आत्ता ते 3 लाख झाले असते आणि तीन महिन्यांपूर्वी एक लाख गुंतवले असते तर त्याचे 13 लाख रुपये झाले असते.
3i Infotech ही एक हिंदुस्थानी आयटी कंपनी असून 1993 मध्ये तिची स्थापना झाली होती. 2005 मध्ये या कंपनीचा शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला होता. 2007 मध्ये या कंपनीचा शेअर 150 पार गेला होता, मात्र 2009 पासून शेअरची घसरण सुरू झाली आणि 2019 मध्ये हा शेअर दोन रुपयांच्याही खाली पोहोचला होता. परंतु गेल्या तीन महिन्यात या शेअरने चांगला पीकअप घेतला आहे.

























































