फिरते वाचनालय, अवघ्या एक रुपयात आजीवन सदस्य; जीवन इंगळे यांचा सेवाभावी उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीवन इंगळे जेव्हा सायकलवरून फिरतात तेव्हा प्रवासात अनेक लोक भेटतात. त्यांच्या बॉक्समध्ये काय आहे ते विचारतात.  फिरते वाचनालय म्हणजे काय याची विचारणा करतात. इंगळे लोकांची वाचनाची आवड बघून त्याप्रमाणे पुस्तके वाचायला देतात. पुस्तके वाचून झाल्यावर ती परत घेण्यासाठी पुन्हा वाचकांच्या घरी जातात. जर एखाद्या वाचकाने आवडत्या पुस्तकाची मागणी केली की, इंगळे ते पुस्तक मिळवून देतात.

जीवन इंगळे, वय वर्षे 67…सायकलवर बसून बुध काटेवडी भागातील 14 गावांमध्ये फिरतात. त्यांच्या सायकलवर पुस्तकांचा गठ्ठा आणि ‘फिरते वाचनालय’ असा फलक दिसतो. ते बघून लोक कुतूहलाने थांबतात. त्यापैकी पुस्तकांची आवड असणारा कुणीही फक्त एक रुपया देऊन फिरत्या वाचनालयाचा आजीवन सदस्य होऊ शकतो. गेली 14 वर्षे जीवन इंगळे यांचा सेवाभावी उपक्रम अखंड सुरू आहे.

खटाव तालुक्यातील बुध गावात राहणारे जीवन इंगळे यांचे  वडील स्वातंत्र्यसैनिक होते. अकरावीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि पुढे सुमारे 25 वर्षे शेती केल्यानंतर जीवन इंगळे यांनी वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्याचा निर्धार केला. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक उपक्रम सुरू केला.  आजूबाजूच्या गावांतील लोकांना वाचनाची गोडी लागावी म्हणून फिरते वाचनालय सुरू केले. मागील 14 वर्षे सायकलवरून फिरते वाचनालय चालवत आहेत. त्यांच्या वाचनालयात 2565 पुस्तके आहेत. यामध्ये चरित्र, कथा, कादंबरी, काव्यसंग्रह, अध्यात्म, शास्त्रज्ञ, विज्ञान, पर्यावरण, पक्षीमित्र, प्राणी आदी अनेक ग्रंथांचा समावेश आहे.

 इंगळे यांची सर्वोदय सामाजिक संस्था आहे. संस्थेची दोन एकर जमीन आहे. त्यावर निवासी संस्कार केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. व्यसनमुक्ती, पर्यावरण, स्त्री भ्रूणहत्येविरोधात जागृती, झाडे लावा, झाडे जगवा, मुलांसाठी सायकल क्लब,  ट्रेकिंग स्पर्धा असे उपक्रम आहेत.

”आमच्या संस्थेला कोणतेही उत्पन्न नाही. लोक देणगी स्वरूपात संस्थेला पुस्तके भेट देतात. त्यामुळे दरवर्षी  100 ते 150 पुस्तके फिरते वाचनालय उपक्रमाला देणगीतून मिळतात. बालसंस्कार हा माझा मुख्य विषय आहे. लहान मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून ‘घर तेथे श्यामची आई’ ही संकल्पना मी राबवतो”

  • जीवन इंगळे