
बारा आणि चोवीस वर्षे सेवा दिलेल्या शिक्षकांसाठी होणारे सेवांतर्गत प्रशिक्षण विनामूल्य करण्याची मागणी शिक्षक करीत आहेत. सेवांतर्गत प्रशिक्षणासाठीचे शुल्क रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला आहे.
केंद्र सरकारने सुचविलेली त्रिस्तरीय वेतनश्रेणी देताना 12 आणि 24 वर्षे सेवा देणाऱया शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड श्रेणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मागील 20 वर्षांपासून शिक्षकांना हे सेवांतर्गत प्रशिक्षण मोफत दिले जात आहे. मात्र गेली चार वर्षे शिक्षण विभागाने हे प्रशिक्षणच आयोजित केले नाही. त्यामुळे हजारो शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणीपासून वंचित राहिले आहेत. यंदा सेवेतील शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन केले असले तरी त्यासाठी दोन हजार रुपये शुल्क लागू करण्यात आले आहे. याला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विरोध केला आहे.
सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्वीप्रमाणे विनाशुल्क न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे. तसेच 10 वर्षे सेवा झाली त्यांना वरिष्ठ श्रेणी व 22 वर्षे सेवा झालेल्यांना निवड श्रेणीसाठीचे प्रशिक्षण द्यावे. तसेच प्रशिक्षणासाठी अर्ज करताना शालार्थ आयडी नोंदविण्याची अट रद्द करावी, जेणेकरून विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयंशासित, शाखेतील शिक्षकांना प्रशिक्षण घेता येईल, अशी मागणी महासंघाचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी केली आहे.































































