खंबीरतेची शिकवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विशाल मोरे

मराठी साहित्य विश्वातील कादंबरी हा साहित्य प्रकार ‘बाबा पद्मनजी’ यांच्या ‘यमुना पर्यटन’पासून सुरू झाला. हा प्रवास आज दीडशे-दोनशे वर्षे निरंतर सुरू आहे. अनेक प्रख्यात कादंबरीकारांनी यात मोठी भर घालून कादंबरी या साहित्य प्रकार वाचनीय केला. कादंबरी म्हटलं की, शृंगारिक साज देऊन केवळ मनोरंजनाच्या हेतूसाठी तयार केलेली साहित्यकृती असा गैरसमज काही वाचकांत रूढ होता, पण काही कादंबरीकार याला अपवाद ठरले. लेखक बाळासाहेब कांबळे हे त्यापैकीच एक. त्यांची ‘लोकायत प्रकाशन’ यांनी प्रकाशित केलेली ‘भिनवाडा’ ही कादंबरी सध्या चर्चेत आहे. प्रथमदर्शनी ‘भिनवाडा’ या शीर्षकावरून ही ‘रहस्यमय कादंबरी’ आहे का? असे कुतूहल निर्माण होते.

सातारा जिह्यातील माण-खटाव यासारख्या दुष्काळी, शुष्क भागातील ‘विश्वास देठे’ नामक एक नवनियुक्त शिक्षक महाबळेश्वरच्या परिसरातील जावळी खोऱ्यात, कोयना धरणाच्या बॅकवॉटरनजीक निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या ‘ढेणवेळे’ नावाच्या गावात डोंगरदऱ्यांतील शाळेत नव्याने रुजू होतो आणि आधीच संघर्षमय जीवन जगणाऱया गावकऱयांमध्ये आणखी एकाची भर पडते. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील ‘गुरुजी’ म्हणजे अनेक वर्षांपासून एक ‘समाजमान्य घटक आहे. गावातील अनेक घटनांची चर्चा, विचारविनिमय करण्यासाठी आजही ग्रामीण भागात गुरुजींचा सल्ला घेतला जातो. विद्यार्थीरूपी फुलांमध्ये शिक्षक तन-मन-धनाने फुंकर घालून सुवास निर्माण करत असतो, पण त्याचे श्रेय गुरुजींना बऱ्याचदा मिळत नाही. या समाजमान्य घटकाच्या श्रेयावर अनेक घटक टपलेले असतात. आपण गावाचाच एक घटक आहोत या भावनेतून विश्वास गावातील ग्रामस्थांच्या सुखदुःखात सहभागी होत राहतो. येथील जगण्याचा भाग बनल्याने अपरिहार्यपणे लोकांसमवेत नदीवर जाऊन खेकडे, मासे पकडणे यातही ‘विश्वास’ सहभागी होतो. त्याच्या या वागण्याने लोकांना तो आपलासा वाटतो. बाबूदादा, मानूदादा, बन्याबाबा अशी डोंगरदऱ्यांत, कडेकपारीत राहून संघर्ष करणारी, जीव लावणारी माणसे लेखकाने हुबेहूब साकारली आहेत.

कोयनेचा विशाल वीज प्रकल्प झाल्याने राज्याला अखंड उजेड मिळाला, पण त्यासाठी त्यांच्या जमिनी, घरे गेल्याने ते गावकरी मात्र निर्वासित झाले. त्यांचे जगणे मात्र अजूनही अंधारातच आहे. किमान पायाभूत सुविधा किंवा ठोस आर्थिक विकास यापासून हे गावकरी दूर असले तरी निसर्गाची मदत घेऊन त्यांनी उदरनिर्वाहाची वेगळी वाट निर्माण केलेली आहे. शासनाने जमिनी गेलेल्या शेतकऱयांचे शेकडो मैल दूर पुनर्वसन केले, पण त्यांनी तिथेच डोंगरात आपला निवारा शोधला. हे सर्व वर्णन वाचले की, ‘विश्वास पाटील’ यांची ‘झाडाझडती’ डोळ्यासमोर उभी राहते. ‘सखनबाबांच्या’ व्यक्तिरेखेतून ‘बनगरवाडी’तील कारभारी दृष्टीस पडतो, पण बनगरवाडीतील प्रत्येक माणूस हा गावातील शिक्षकाच्या शब्दाबाहेर नव्हता. आजची परिस्थिती मात्र यापेक्षा भिन्न आहे. आजही डोंगरदऱ्यांत प्रामाणिकपणे विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या असंख्य शिक्षकांचा ‘विश्वास देठे’ हा नायक आहे. महाराष्ट्रातील तमाम नवनियुक्त शिक्षकांचे तो प्रतिनिधित्व करतो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शिक्षकांना मिळणारी माया, आपुलकी विश्वासलादेखील अनुभवायला मिळाली, पण त्याचबरोबर त्याला गावातील राजकीय व्यक्तींच्या मनोवृत्तीशी संघर्ष करावा लागला. पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेणारे ग्रामस्थ आणि स्वार्थापोटी खोटी आश्वासने देऊन कर्मचाऱ्यांचे सॅन्डविच करणारे पुढारी यांची प्रतिमा वाचकांपर्यंत पोचवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. केवळ गावच्या शाळेसाठी डोक्यावरून शाळेच्या तांदळाची पोती वाहून नेणारा दगडूदादा, भयाण वादळवाऱ्यांत नदीत लॉन्च घालणारा रमेशतात्या, विश्वासला स्वप्नातला राजकुमार मानणारी सुनंदा, सखनबाबाइतकीच आईची माया लावणारी त्यांची पत्नी ‘तुळसा’ ही पात्रे वाचकाच्या मनात घर करून राहतात.

शाळा तपासणीसाठी येणारे साहेब, ‘आप्पाशेठ’ या राजकीय पुढाऱयाबरोबर निवडणूक काळात झालेला संघर्ष मांडताना किंवा तांदूळ उचल, शाळा दुरुस्ती या प्रसंगांतून शासन, प्रशासन यांच्यातील उणिवा निर्भीडपणे मांडण्यात लेखणी यशस्वी झाली आहे. दादांसारखे संयमी व आदर्श शिक्षक आणि बापूसाहेबांसारखे ‘आदर्श अधिकारी’ हे या व्यवस्थेतील आशेचे किरण ठरतात. जिल्हा परिषद शाळेतील प्रसंग वाचन करताना ‘डॉ.संजय कळमकर’ यांची ‘सारांश शून्य’ कादंबरी नकळत नजरेसमोर येते. कादंबरीमध्ये लेखकाने कुठेही प्रकरण रचना केलेली नसल्याने चित्रपटाप्रमाणे एकामागून एक कथा प्रसंग डोळ्यांसमोरून सरकत जातात. त्यामध्ये एकसंधपणा नजरेस पडतो. यामध्ये ग्रामीण बोलीभाषेचा वापर केलेला असल्याने काही शब्द समजण्यास मागील शब्दार्थांचा आधार घ्यावा लागतो किंवा पुन्हा वाचल्याने अर्थ आपोआप समजतो आहे. लेखक बाळासाहेब कांबळे यांनी केवळ फुटकळ मनोरंजनासाठी लेखणी न उचलता निसर्ग जपणूक, भ्रष्टाचार, जाती व्यवस्था, ग्रामीण जीवनातील संघर्ष यांची खुलेपणाने मांडणी करण्याचे धारिष्टय़ दाखवल्यानेच ‘भिनवाडा’ वाचनीय ठरली आहे.

भिनवाडा
लेखक : बाळासाहेब कांबळे
प्रकाशक : लोकायत प्रकाशन
मूल्य : रुपये 225/-