कोपरगावात पहाटे दाट धुक्याची चादर; संध्याकाळी धुळीची चादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगावात रविवारी पहाटे दाट धुक्यांची चादर पसरली होती. रविवारी हवेत गारवा जाणावत आहेच, त्याच बरोबर धुक्याची चादर ही पसरली आहे. तर संध्याकाळी धुळीची चादर परसल्याने प्रदूषण असल्याचेही दिसून आले. मात्र, हवेत गारवा असल्याने नागरिक सुखद अनुभव घेत आहेत.

गेले तीन दिवस अवकाळी पावसानंतर पारा बऱ्यापैकी खाली आला असून धुरकट वातावरण निर्माण झाले आहे. दाट धुक्यामुळे सकाळी दृष्यमानताही कमी झाली होती. दाट धुक्यामुळे गाड्याही संथगतीने मार्ग काढत होत्या. कोपरगावमध्ये धुके पसरल्याने रविवारी पहाटेपासून कोपरगावचे वातावरण आल्हाददायक वाटत होते.

या वातावरणात पहाटे धुक्याचा आणि थंडीचा आस्वाद घेण्यास नागरिक बाहेर पडले होते. दुपारी काही वेळ ऊन पडल्याने धुक्याची चादर कमी झाली असली तरी त्याची जागा संध्याकाळी शहरातील उठणाऱ्या धुळीने घेतल्यामुळे धुळीची चादर पसरली होती. त्यामुळे पहाटे धुक्याचा अल्हाददायक आनंद घेणाऱ्या कोपरगावच्या नागरिकांना संध्याकाळी धुळीच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. कोपरगावात रविवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. येत्या काही दिवसात काही भागात हलक्या पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याने दिवसाचा गारवा कायम आहे.